महिलांसाठी, चेहऱ्यावर अनावश्यक केस वाढणे हे चिंतेचे एक कारण नक्कीच असू शकते व त्याचा आत्मसन्मानावर आणि आत्मविश्वासावर परिणाम होऊ शकतो.
साधारणपणे मुली आपल्या सौंदर्याबाबत जागरूक असतातच. अन् आजकाल आपण सौंदर्याची व्याख्या अशी करून ठेवली आहे की, चेहऱ्यावर जरा पुरळ उठली, डाग दिसला किंवा जरा केस दिसून आले तरी आपल्याला आभाळाएवढे टेंशन येते. पण आपण हरनाम कौर या बाईबद्दल ऐकलंय का? तिने आधी अगदी आत्महत्येपर्यंत विचार करून मग आता आपल्याला आलेल्या दाढी मिशीसह बिनधास्त जगासमोर फिरते आहे आणि जागरूकताही आणते आहे.
सामान्यपणे प्रत्येक महिलेच्या चेह-यावर लव स्वरूपात केस असतात. पण १५ ते २० टक्के स्त्रियांच्या ओठावर, हनुवटीवर, गालावर, गळ्यावर, मानेवर अन् काही प्रमाणात कपाळावर जास्त प्रमाणात, जाडसर आणि गडद केसांची वाढ दिसून येते. पण चेहऱ्यावर केस येण्याची ही स्थिती कशामुळे येऊ शकते याबद्दल आपण आज बोलू.
टेस्टोस्टेरॉन हा पुरूष हार्मोन सर्व महिलांमध्ये कमी प्रमाणात तयार होत असतो व एस्ट्रोजेन हा स्त्री हार्मोन मोठ्या प्रमाणात असतो. हे दोन्ही हार्मोन मिळून महिलांमध्ये पुनरुत्पादक स्थिती, शारीरिक बदल, विकास या गोष्टींची काळजी घेतात. मात्र जर टेस्टोस्टेरॉनची पातळी जास्त प्रमाणात तयार झाली तर महिलांमध्ये काही शारीरिक समस्या निर्माण होऊ होतात.
या समस्यांपैकीच एक म्हणजे चेहऱ्यावर दाढी-मिशी येणे म्हणजेच चेहऱ्यावर केस उगवणे. या स्थितीला वैद्यकीय भाषेत हिर्सुटिजम म्हटले जाते.
हिर्सुटिजमची लक्षणे कोणती?
हिर्सुटिजममध्ये चेहऱ्यावर, छातीवर, पोटावर जाडसर केस येणे, अनियमित पाळी किंवा पाळी बंद होणे, अचानक वजन वाढणे, केस गळणे (पाठीमागे टक्कलसारखा प्रकार), आवाज जाडसर होणे व त्वचाविकार दिसून येऊ शकतात.
हिर्सुटिजमची कारणे पुढीलप्रमाणे असू शकतात.
पीसीओस : पीसीओस किंवा पीसीओडीचा रोग हा स्त्रियांच्या चेहऱ्यावर जास्त केस येण्याचे मुख्य कारण असू शकते. या स्थितीदरम्यान शरीरातील हार्मोन्सचे संतुलन बिघडू लागते. ज्यामुळे चेहऱ्यावर अतिरिक्त केस वाढू लागतात. पीसीओएस असल्यास इन्सुलिन प्रतिरोधकता येण्याची शक्यता जास्त असते. यामुळे शरीर अधिक इन्सुलिन तयार करते व टेस्टोस्टेरॉन सारख्या अँड्रोजनच्या पातळीत वाढ होते. अतिरिक्त अँड्रोजनमुळे नितंबांवर, पाठ, चेहरा आणि छातीवर केसांची वाढ होऊ शकते.
जास्त बॉडी मास इंडेक्स : जास्त बॉडी मास इंडेक्स (बीएमआय) असलेल्या रुग्णांमध्ये हर्सुटिझम जास्त प्रमाणात आढळून येतो.
एन्झाईमची कमतरता : महिलांच्या शरीरात एन्झाईम्सच्या कमतरतेमुळे शरीरात पुरुष हार्मोन टेस्टोस्टेरॉनचे प्रमाण जास्त असते. यामुळे चेहऱ्यावर आणि शरीरावर अतिरिक्त केस वाढण्याची समस्या उद्भवते.
हायपरट्रिकोसिस : याला वेअरवॉल्फ सिंड्रोम असेही म्हणतात आणि हे हायपोथायरॉईडीझम, अॅक्रोमेगाली (शरीरातील वाढीच्या संप्रेरकाचे प्रमाण), कुपोषण आणि एचआयव्हीसारख्या अनेक रोगांमुळे देखील होऊ शकते. हायपरट्रिकोसिसमुळे नाकाच्या टोकाजवळ आणि कानाजवळ जास्त केस वाढू लागतात.
कुशिंग सिंड्रोम : या वैद्यकीय स्थितीमध्ये एड्रेनल ग्लँडच्या व्यत्ययामुळे शरीर अतिरिक्त कॉर्टिसोल तयार करण्यास सुरुवात करते ज्याला स्ट्रेस हार्मोनदेखील म्हणतात. अतिरिक्त केसांची जास्त वाढ, जास्त वजन वाढणे, उच्च रक्तदाब आणि चिडचिडेपणा कुशिंग सिंड्रोमने ग्रस्त असलेल्या महिलांमध्ये दिसून येतो.
औषधे : काही औषधांच्या सेवनामुळे महिलांच्या शरीरावर नको असलेले केस वाढू लागतात. होर्मोनल थेरपी आणि एंडोमेट्रिओसिसच्या उपचारांमध्ये वापरल्या जाणार्या औषधांमुळे आणि मल्टीपल इन्फ्लेमेशनच्या उपचारांमध्ये वापरल्या जाणार्या ग्लुकोकोर्टिकोइड्समुळे देखील स्त्रियांमध्ये केसांची असामान्य वाढ होऊ शकते. अॅनाबॉलिक स्टिरॉइड्स वापरल्याने देखील महिलांच्या चेहऱ्यावरील केसांची वाढ होऊ शकते.
रजोनिवृत्ती व गर्भधारणा : महिलांना रजोनिवृत्ती वेळीही हनुवटीवर केस उगवू शकतात. त्यावेळी महिलांमध्ये फिमेल हॉर्मोन्स स्रवत नसतात. मात्र ती पीसीओडीची स्थिती नसते. तसेच काही वेळा गर्भारपणातही हॉर्मोन्समध्ये असमतोल होऊन हनुवटीवर केस उगवण्याची समस्या उद्भवते.
चेहऱ्यावरील अनावश्यक केस कसे काढायचे?
सामान्यपणे चेहऱ्यावरील केस काढण्यासाठी वॅक्सिंग, प्लकिंग, शेव्हिंग किंवा ब्लीचिंगसारख्या पारंपरिक केस काढण्याच्या पद्धती वापरल्या जातात. डॉक्टर हार्मोनल पातळी नियंत्रित करण्यासाठी औषधे देऊ शकतात. अतिरिक्त केस काढून टाकण्यासाठी इलेक्ट्रोलायसिस आणि लेसर पद्धत वापरून केस काढणे हे दोन मुख्य उपचार आहेत.
इलेक्ट्रोलायसिस : त्वचारोगतज्ज्ञ सुईद्वारे केसांच्या कूपात विद्युत प्रवाह देतात. इलेक्ट्रोलायसिस वापरून केसांच्या कूपांचा नाश केला जातो आणि त्यांना पुन्हा वाढण्यापासून रोखले जाते.
लेसर पध्दतीने केस काढणे : अनावश्यक केस काढण्यासाठी लेसर किंवा तीव्र स्पंदित प्रकाश वापरला जातो. पण हा कायमचा उपाय नसतो आणि त्वचा टॅन झालेली असल्यास किंवा शरीराचे केस हलके असल्यास हा उपाय तितका प्रभावी ठरत नाही. महिलांसाठी, चेहऱ्यावर अनावश्यक केस वाढणे हे चिंतेचे एक कारण नक्कीच असू शकते व त्याचा आत्मसन्मानावर आणि आत्मविश्वासावर परिणाम होऊ शकतो. पण तसे होऊ न देता मूळ कारण शोधून त्यावर उपाय शोधण्याचा प्रयत्न असावा.
आरोग्याची काळजी घेत, स्वतःला जसे आहात तसे स्वीकारण्याची तयारी असावी.
डॉ. श्वेता राऊत मुळगावकर