पणजी : डॉक्यूबेच्या गोव्यातील गुन्हे विश्वातील प्रसिद्ध अशा महानंद नाईक याच्यावर आधारीत ‘द दुपट्टा किलर’ या माहितीपटाचे विशेष प्रदर्शन पणजी येथील एंटरटेन्मेंट सोसायटी ऑफ गोवा येथे शनिवारी झाले.
यावेळी चित्रपटाचे निर्माते, योगदानकर्ते आणि गोव्यातील इतर मान्यवर उपस्थित होते. गोव्यातील कुख्यात दुपट्टा किलर महानंद नाईक याच्यावर आधारीत हा माहितीपट अाहे. या भयावह गुन्ह्यांची साक्ष देणाऱ्या पोलीस अधिकारी, पत्रकार, कायदे तज्ज्ञ आणि इतरांशी संवाद साधण्याच्या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमात गोवा पोलीस महासंचालक अलोक कुमार, तुरूंग महासंचालक ओमवीर सिंग, गुन्हा शाखा अधीक्षक राहुल गुप्ता, दक्षिण गोवा अधीक्षक टीकम सिंग, पोलीस निरीक्षक निखिल पालेकर, सचिन पन्हाळकर, एजी. अॅड. देविदास पांगम, फौजदारी खटला विभागाचे संचालक अॅड. पूनम भरणे, अॅड. विक्रम वर्मा आणि अॅड. फ्रान्सो यांची उपस्थिती होती.
दिग्दर्शक पॅट्रिक ग्रॅहॅम म्हणाले की, ही डॉक्युमेंटरी दिग्दर्शित करणे हा एक मोहक, काहीवेळा धक्कादायक आणि दुःखद, तर बहुतेक वेळा समाधानकारक अनुभव होता. वास्तविक जीवनातील कथा सांगताना, मी नेहमी रोचक कथन आणि ज्यांना याचा परिणाम झाला त्यांचा सन्मान करण्याची जबाबदारी यात समतोल राखण्याचा प्रयत्न करतो. घडलेल्या भयानक घटनांना सवलत देऊ इच्छित नव्हतो, पण त्याचवेळी त्यांचा फायदा घेण्याचा भासही होऊ द्यायचा नव्हता. ‘द दुपट्टा किलरमध्ये, आम्ही केवळ गुन्ह्यापर्यंत मर्यादित न राहता, त्याला वाव देणाऱ्या संस्थात्मक अपयशांचा विचार करण्याचा आणि या कथेमुळे उद्भवणाऱ्या कठीण पण आवश्यक प्रश्नांना सामोरे जाण्याचा प्रयत्न केला आहे.
‘द दुपट्टा किलर’चे संशोधक आणि सर्जनशील सल्लागार, पत्रकार मुकेश कुमार यांनी गोव्यातील संपूर्ण संशोधन प्रक्रियेत महत्त्वपूर्ण भूमिका निभावली आहे. त्यांनी कथेला मूर्त स्वरूप देण्यात आणि ती पडद्यावर आणण्यात मदत केली आहे. या प्रकरणाच्या गुंतागुंतीचे अचूक चित्रण करण्यात त्यांचे योगदान निर्णायक ठरले आहे.