म्हापसा : मी विकामकाम करताना राजकारण करत नाही. पण काही विरोधक आमदार विकासकामात उगाच अडथळे आणण्याचा पर्यटन करतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गेल्या दहा वर्षांच्या कार्यकाळात एकही घोटाळा झाला नाही. तर काँग्रेसच्या दहा वर्षांत ७८ घोटाळे झाले होते, अशी टीका मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केली.
शनिवारी ११ रोजी म्हापसा येथील पक्षाच्या जिल्हा कार्यालयात भाजपचे उत्तर गोवा जिल्हाध्यक्ष म्हणून दयानंद कार्बोटकर यांची बिनविरोध निवड झाल्याची घोषणा करण्यात आली. नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष कार्बोटकर यांनी पक्ष, प्रदेशाध्यक्ष व मुख्यमंत्र्यांनी दाखविलेल्या विश्वासाबद्दल सर्वांचे आभार मानले. पक्ष संघटनेसाठी झटत राहणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली. यावेळी केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक, मंत्री रोहन खंवटे, आमदार केदार नाईक, डिलायला लोबो, प्रेमेंद्र शेट, माजी आमदार दयानंद सोपटे, सिद्धार्थ कुंकळ्येकर व इतर पदाधिकारी उपस्थित होते.
मुख्यमंत्री डॉ. सावंत म्हणाले की, भाजप पक्ष संघटनेचे काम करताना, सामान्य कार्यकर्त्याला पक्षाला सूचना किंवा सल्ले देण्याचा पूर्ण अधिकार आहे. त्यांनी योग्य व्यासपीठावरुन आपले म्हणणे मांडावे. सार्वजनिक स्थळी मनातील हेवेदावे बोलून दाखवू नये. दयानंद कार्बोटकर हे गेली २६ वर्षे पक्षासाठी काम करत आहेत. प्रामाणिकपणे पक्ष संघटनेसाठी काम करणार्या कार्यकर्त्यांची भाजप नेहमीच दखल घेत, त्यांना पोचपावची देते.
आगामी २०२७ च्या विधानसभा निवडणूकीची तयारी करताना, राज्य किंवा पक्ष संघटनेबाबत जी कामे करावी वाटतात, ती कार्यकर्त्यांनी लेखी किंवा तोंडी स्वरुपात जिल्हाध्यक्ष किंवा प्रदेशाध्यक्षांकडे सूचवावी. त्याप्रमाणे पक्ष संघटना व बांधणीत युवा वर्गाचा सहभाग आम्हाला हवा आहे. याचा अर्थ आम्ही वरिष्ठांना बाजूला सारणार नाही. त्यांची योग्य वेळी उच्च पदावर नेमणूक केली जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे म्हणाले की, काँग्रेसने स्वतःच्या स्वार्थासाठी व खुर्ची वाचविण्यासाठी संविधानात वेळोवेळी बदल केला. तसेच नेहमीच खोटारडेपणाचे राजकारण केले, उलट भाजपने केवळ देशाच्या प्रगतीसाठी काम केले. गेल्या लोकसभा निवडणूकीत काँग्रेसने खोटा प्रचार करीत, भाजप सत्तेत आल्यास संविधान बदलणार असे सांगितले. त्यामुळे भाजपला ४००चा आकडा पार करता आला नाही.
भाजपवर लोकांचा विश्वास आहे. राज्यात आतापर्यंत ४ लाख २५ हजार जणांनी भाजपची प्राथमिक सदस्यता स्वीकारली. पक्षाचे विचार तसेच देशाला भाजप आणि पंतप्रधान मोदींशिवाय पर्याय नाही याच हेतूने अनेक लोकप्रतिनिधी भाजपशी जोडले गेले. त्यामुळे कुणीही नवा-जुना असा भेदभाव करुन चालणार नाही. जे आमदार भाजपात आले आहेत, ते स्वार्थापोटी पक्षात आले नाहीत. पक्षाचे विचार पटल्यानेच व राज्याचा विकास करण्याच्या हेतूने तसेच लोकहितार्थ त्यांनी भाजपात प्रवेश केला, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी स्पष्ट केले.