चानूचा आळस

Story: छान छान गोष्ट |
24th November, 03:42 am
चानूचा आळस

चानू खारीला सकाळी सकाळी जाग आली ती आईने तिच्यावर पाणी ओतले म्हणूनच. “कधीपासून उठवतेय! कार्टी ऐकेल तर शप्पथ!!! घड्याळ बघ जरा...पंधरा मिनटात आवरायचंय... शाळेला उशीर होतोय बघ कसा...” आई प्रचंड चिडली होती. खरंतर तिला प्रचंड झोप येत होती पण आईचा हा अवतार बघून काही न बोलता आता प्रचंड धावपळ करावी लागणार हे चानूला कळून चुकलं. चानूने एकदा आईने ओतलेलं पाणी आपल्या झुपकेदार शेपटीने हळूच उडवलं आणि ती तशीच उठून ब्रश करायला पळाली. खरं तर चानूला अजून झोपच येत होती. पण तरीही रेंगाळत रेंगाळत तिने ब्रश केला, अंगावरून नुसतं नावाला म्हणून पाणी ओतलं, आईला दाखवायला म्हणून खसाखसा डोकं पुसत ती बाथरूममधून बाहेर आली आणि शाळेचा गणवेश घालून डायनिंग टेबलच्या खुर्चीवर येऊन बसली. अजूनही तिला पेंगच येत होती. आईचं बडबडणं काही थांबता थांबत नव्हतं. चानूच्या अशा आळशीपणामुळे आई अजूनच त्रासली होती. 

“दूध ठेवलंय समोर ते पी सगळं. त्याशिवाय काही मी जायला देत नाही तुला.” आई रागाने म्हणाली आणि एवढ्यात शाळेच्या बसच्या हॉर्नचा आवाज आला. आयतीच संधी मिळाली चानूला. पण जाऊ देतेय ती आई कसली! आईने ड्रायव्हर दादांना मोठ्याने खिडकीतून ओरडून सांगितलं, “येतेय येतेय चानू. एक मिनिट फक्त.” आणि आईने डोकं खिडकीतून आत काढताच चानूकडे पाहून डोळे मोठे केले तसं चटकन चानूने दूध संपवलं. रुमाल, दप्तर, पाण्याची बाटली, आयडी कार्ड सगळं एकदा चाचपडून बघून चानू जायला निघाली. एवढ्यात आईने सॉक्स आणि बूट काढून दिले. “आई नको गं आता... उशीर होतोय न... ड्रायव्हर दादा वाट बघतायत बाहेर.” नको नको असा हात हलवत आई म्हणाली, “अगं दिवाळीची सुट्टी संपली आता. पावसाळ्यातले सँडल घालून कुठे चाललीस आता? शाळेचे बूट घालायचे.” कंटाळतच चानूने सॉक्स आणि बूट घेतले आणि ती खुर्चीवर बसून ते पायात घालू लागली. “येते गं आई.” म्हणत ती बाहेर पडली सुद्धा. 

बसमध्ये ड्रायव्हर दादा प्रचंड वैतागले होते. “काय चानू, लवकर उठायचं जरा. किती उशीर झाला आता तो...” त्याने करवादत म्हटले. चानूने एवढा गाल फुगवला आणि ती बसमध्ये चढली. तिला बघताच चिनू ससुली आणि मिनी कासुली खूपच खूश झाले. त्या दोघांची बेस्ट फ्रेंड होती चानू. दोघीही अगदी टवटवीत दिसत होत्या मात्र चानू अजूनही पेंगुळलेलीच दिसत होती. चानूने तर केसांवर कंगवाही फिरवला नव्हता आणि चिनू-मिनी दोघीही छान वेणीफणी करून, टिकली लावून गोडगोड दिसत होत्या बाहुलीसारख्या. चानू शाळेत पोहोचेपर्यंत गाल फुगवूनच राहिली. तिला येत होता प्रचंड आळस आणि झोप. थंडीही मस्त बोचत होती. त्यामुळे अजूनच तिला झोप येत होती आणि बसमध्ये सारख्या ती बसल्या जागी डुलक्याच काढत होती. चिनू आणि मिनी दोघीही दिवाळीच्या सुट्टीत काय काय गमतीजमती केल्या हे इतरांना सांगत होत्या तर चानू मात्र डुलक्या काढतेय. दोन-तीन वेळा तर मिनीने तिला सावरलं. नाहीतर चानू पडलीच असती बसमध्ये. 

बस शाळेच्या आवारात आली आणि सगळ्यांच्या उत्साहाला उधाण आलं. सगळे पटापट बसमधून उतरले आणि आपापल्या वर्गात एका रांगेत जाऊ लागले. सर्व वर्गशिक्षिका आपापल्या वर्गात विद्यार्थ्यांची वाट पाहत होत्या. प्रिन्सिपल सुसर मॅडम तर आपला चष्मा साफ करत सर्वांची प्रार्थनागृहात वाट पाहत होत्या. चानू, मिनी, चिनू, अप्पू हत्ती... सगळे एका वर्गात शिकणारे. वर्गात जाताच त्यांनी त्यांच्या लीना जिराफ टीचरना सुप्रभात म्हणून आपापली दप्तरे आपल्या जागी ठेवली आणि प्रार्थनेसाठी सगळे प्रार्थनागृहात गेले. सगळे उत्साहात प्रार्थना, जंगलगान म्हणत होते पण चानूच्या झोपेने मात्र तिच्यावर जणू जादूच केली होती. तिला प्रार्थना, जंगलगान झाल्याचेही समजले नाही. प्रार्थना झाल्यावर सगळे वर्गात येताच लीना टीचरने सर्वांना सुट्टीत काय काय मज्जा केली, कुणी कुणी दिवाळी कशी साजरी केली हे विचारले. सर्व छोटी छोटी पिल्ले आपापली दिवाळी कशी त्यांनी साजरी केली हे सांगत होती. चानू मात्र बेंचवर बसून कधीच झोपून गेली होती. 

चानूचे नाव घेताच चानू गडबडून उठली आणि सगळेच वर्गात हसू लागले.

“काय झालं चानू? सुट्टी अजून संपली नाही का तुझी? झोप येतेय का?” लीना टीचरने असं विचारताच मोठा आळस आवरत चानू होकारार्थी मान हलवू लागली. “सुट्टीत आळस जमवलास ना अंगात, चानू? आळस हा आपला शत्रू असतो. उलट सुट्टीत छान छान खेळ खेळायचे, आता हिवाळ्यात तर मुद्दाम प्राणायाम, योगा इतर व्यायाम करायचे. म्हणजे आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढून आपले आरोग्य अजून चांगले राहते. हिवाळ्यात होणारा ताप, सर्दी खोकला सुद्धा आपल्यापासून लांब राहतो.”

“हो बाई मला ना सर्दी झालीये. नाकही वाहतंय, हे बघा सुक सुक” चानूने नाक दाखवत म्हटलं.

“मग आता आळशीपणा झटकून टाक बघू. बघ सगळे किती आनंदात आज शाळेत आले. सर्वांनी व्यायाम करायला सुरुही केला. सकाळी छान चालून येतात चिनू आणि मिनी. घरी येऊन सूर्यनमस्कारही घालतात दहा दहा आपल्या गॅलरीत.” 

“टीचर, सकाळी आम्हाला किती छान छान गोष्टी पहायला मिळतात. गवतावरचे दवबिंदू हातावर घेता येतात, त्यावरून चाललो की किती गार गार लागतं पायांना. आणि सबंध दिवस मस्त फ्रेश वाटतं ते तर वेगळंच!” मिनी कासुलीने सांगितले. मघाशी सगळे हसल्यामुळे चानूला वाईट तर वाटलेच होते त्यात आता मिनी कासुलीने असे सांगताच आपण किती मजा चुकवतोय असे वाटून चानूला अजूनच वाईट वाटले. तिने लगेच टीचरना सांगितले, “टीचर, मी उद्यापासून नाही, आज संध्याकाळपासूनच फिरायला जात जाईन. सकाळी लवकर उठून व्यायाम करेन. आळशीपणा अज्जिबात करणार नाही.” सर्व पिल्लांनी टाळ्या वाजवल्या आणि चानूला प्रोत्साहन दिलं. 

संध्याकाळी चानू रनिंग शूज आणि घाम पुसायचा नॅपकीन घेऊन फिरायला जायला तयार झाली.


स्नेहा सुतार