गोवा : गुणवंत विद्यार्थी, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा सन्मान

जीटीडीसी कर्मचारी कल्याण संघटनेतर्फे गुणवंतांना प्रमाणपत्र व रोख पारितोषिके

Story: न्यूज डेस्क। गोवन वार्ता |
30th October 2024, 07:46 pm
गोवा : गुणवंत विद्यार्थी, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा सन्मान

सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा सन्मान केल्यानंतर जीटीडीसीचे अध्यक्ष डॉ. गणेश गावकर व इतर पदाधिकारी.

पणजी : जीटीडीसीच्या कर्मचारी कल्याण संघटनेने जीटीडीसी कर्मचाऱ्यांच्या मुलांच्या उत्तम शैक्षणिक कामगिरीचा गौरव करण्यासाठी विशेष सत्कार समारंभ आयोजित केला होता. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून सावर्डेचे आमदार आणि जीटीडीसीचे अध्यक्ष डॉ. गणेश गावकर यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व रोख पारितोषिके प्रदान करण्यात आली.
डॉ. गावकर यांनी विद्यार्थ्यांच्या मेहनत आणि चिकाटीबद्दल त्यांचे कौतुक केले आणि त्यांचे भविष्य घडवण्यात शिक्षणाची महत्त्वपूर्ण भूमिका अधोरेखित केली. त्यांनी सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना शुभेच्छा दिल्या आणि महामंडळासाठी केलेल्या वचनबद्ध सेवेबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
पर्यटन संचालक तथा जीटीडीसीचे व्यवस्थापकीय संचालक सुनील अंचिपाका, आयएएस यांनी देखील जीटीडीसी कर्मचाऱ्यांच्या मुलांनी वेगवेगळ्या परीक्षांमध्ये मिळविलेले यश आणि त्यांच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या समर्पित सेवेबद्दल त्यांना शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये जीटीडीसीचे महाव्यवस्थापक आणि कर्मचारी कल्याण संघटनेचे अध्यक्ष लक्ष्मीकांत वायंगणकर, उपमहाव्यवस्थापक (विपणन) आणि संघटनेचे सचिव दीपक नार्वेकर, महाव्यवस्थापक आणि संघटनेचे उपाध्यक्ष कपिल पैंगिणकर, सरव्यवस्थापक सचिन गोरे, उपमहाव्यवस्थापक संदीप गावस, वरिष्ठ व्यवस्थापक अमिता देसाई, व्यवस्थापक अनिल दलाल आणि सहाय्यक व्यवस्थापक दीपा सावकर यांचा समावेश होता.
दीपक नार्वेकर यांनी सूत्रसंचालन केले. लक्ष्मीकांत वायंगणकर यांनी स्वागतपर भाषण केले. फ्रान्सिस परेरा (वरिष्ठ व्यवस्थापक), अल्झिरा गोम्स (व्यवस्थापक), देविदास गावस देसाई, पुरस्कारप्राप्त विद्यार्थिनी श्रुतिका सुरेश नाईक हिच्यासह सेवानिवृत्त कर्मचारी सदस्यांनी कार्यक्रमादरम्यान आपले विचार मांडले.

हेही वाचा