फुटबॉलप्रेमी मुलांसाठी ममतादीदी सरसावल्या

फिफा अंडर-१७ विश्वचषक स्पर्धेता मान भारताला मिळाला आहे. स्पर्धेचा अंतिम सामना कोलकाताच्या ऐतिहासिक सॉल्टलेक स्टेडियमवर खेळविला जाणार आहे.


14th September 2017, 03:33 am
कोलकाता : फिफा अंडर-१७ विश्वचषक स्पर्धेता मान भारताला मिळाला आहे. स्पर्धेचा अंतिम सामना कोलकाताच्या ऐतिहासिक सॉल्टलेक स्टेडियमवर खेळविला जाणार आहे. या महत्त्वाच्या स्पर्धेला जास्तीत जास्त लोकांनी हजेरी लावावी याकरता पश्चिम बंगाल सरकार प्रयत्नशील आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी कोलकात्यात होणाऱ्या १० सामन्यांसाठी ५ हजार विद्यार्थ्यांना मोफत पास देण्याचे निश्चित केले आहे.
कोलकाता सरकारच्या शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. दि. २८ ऑक्टोबरला कोलकात्यात विश्वचषकाचा अंतिम सामना खेळवला जाणार आहे. त्यापूर्वी स्पर्धेतील आणखी नऊ सामनेही येथे खेळवले जाणार आहेत. त्यासाठी शहरातील विविध शाळा आणि महाविद्यालयातील ५ हजार मुलांना या सामन्यांचे मोफत पास दिले जाणार आहेत. केवळ फुटबॉल खेळात स्वारस्य असलेल्या खेळाडूंनाच हे पास देण्यात येतील.
कोलकाता शहरात फुटबॉलची आवड प्रचंड आहे. या खेळाडुंना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे.