शिक्षकांच्या बदलीवरून पेडणेनंतर वाळपईतील विद्यार्थ्यांचा वर्गावर बहिष्कार

बदली केलेल्या शिक्षकांना परत आणेपर्यंत वर्गावर बहिष्कार : विद्यार्थ्यांचा इशारा; शिक्षकांच्या बदलीवरून पेडणे सरकारी उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी आंदोलन पुकारल्यानंतर याच कारणावरून वाळपई सरकारी उच्च माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरू केले आहे. आणि वर्गावर बहिष्काराचे अस्त्र उगारले आहे.

Story: प्रतिनिधी।गोवन वार्ता |
2 hours ago
शिक्षकांच्या बदलीवरून पेडणेनंतर वाळपईतील विद्यार्थ्यांचा वर्गावर बहिष्कार

वाळपई : शिक्षकांच्या बदलीवरून पेडणे सरकारी उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी आंदोलन पुकारल्यानंतर याच कारणावरून वाळपई सरकारी उच्च माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरू केले आहे. आणि वर्गावर बहिष्काराचे अस्त्र उगारले आहे. 

शैक्षणिक वर्षाच्या मधोमध नवीन शिक्षकांची केली जाणारी भरती प्रक्रिया आणि जुन्या शिक्षकांची बदली केल्याने वाळपई सरकारी उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी शुक्रवारी वर्गावर बहिष्कार घालून निषेध नोंदवला.  बदली केलेल्या शिक्षकांना याच ठिकाणी ठेवण्याची मागणी विद्यार्थ्यांनी केली. जोपर्यंत मागणी पू्र्ण होत नाही तोपर्यंत वर्गात जाणार नाही; असा इशारा विद्यार्थ्यांनी दिला. 

यासंदर्भातील निवेदन विद्यालयाच्या प्राचार्य लक्ष्मी सुखटणकर व शिक्षण संचालकांना दिले आहे. विद्यार्थ्यांच्या म्हणण्यानुसार एकूण ६ शिक्षकांची बदली करण्यात आली आहे. त्यात सर्व विषयाच्या शिक्षकांचा समावेश आहे. लवकरच परिक्षा येणार असून, तोपर्यंत नवीन शिक्षकांशी जुळवून कसे घेणार? अभ्यासावर परिणाम होणार असल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे.

दरम्यान, काल गुरुवारी शिक्षकांच्या बदलीवरून पेडणे सरकारी उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरू केले होते. 

हेही वाचा
सर्व पहा