वीज कोसळल्याने बैल मेला; माऊलीने स्वतःला जुंपून घेतले नांगराला!

लातूरमधील घटनेचा व्हिडिओ व्हायरल. शासनाच्या कर्जमाफीच्या मोठ्या घोषणा हवेतच विरल्या, ग्रामीण भागातील बळीराजाची अवस्था बिकट.

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
7 hours ago
वीज कोसळल्याने बैल मेला; माऊलीने स्वतःला जुंपून घेतले नांगराला!

लातूर : देशात एकीकडे शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी हजारो कोटी रुपयांच्या कर्जमाफीच्या घोषणा केल्या जातात, तर दुसरीकडे ग्रामीण भागातील बळीराजाच्या नशिबातील अंधार आजही कायम असल्याचे भीषण वास्तव पुन्हा एकदा समोर आले आहे. महाराष्ट्राच्या लातूर जिल्ह्याच्या देवणी तालुक्यातील बोंबळी बुद्रुक गावातून निसर्गाच्या अवकृपेमुळे आणि गरिबीमुळे एका शेतकरी माऊलीला चक्क बैलाच्या जागी नांगराला जुंपून घेण्याची वेळ आली आहे. या मन हेलावणाऱ्या आणि प्रशासकीय व्यवस्थेचा संताप आणणाऱ्या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला असून, संपूर्ण देशभरातून यावर तीव्र हळहळ व्यक्त केली जात आहे.



मिळालेल्या माहितीनुसार, येथील स्थानिक शेतकरी काशिनाथ गायकवाड आणि त्यांच्या पत्नी हौसाबाई गायकवाड यांनी काही महिन्यांपूर्वीच मोठ्या कष्टाने एक लाख वीस हजार रुपये गोळा करून एक देखणी बैलजोडी खरेदी केली होती. मात्र, गेल्या आठवड्यात झालेल्या अनपेक्षित अवकाळी पावसादरम्यान शेतात वीज कोसळली आणि त्यामध्ये त्यांच्या एका बैलाचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. आधीच आर्थिक विवंचनेत असलेल्या या कुटुंबासमोर अचानक नव्या बैलासाठी पैसे कुठून आणायचे, हा यक्षप्रश्न निर्माण झाला. त्यातच पावसाळा सुरू झाल्याने पेरणीचा हंगाम अगदी तोंडावर आला आहे. योग्य वेळी शेतीची मशागत न केल्यास संपूर्ण वर्ष वाया जाण्याची भीती असल्याने, या हताश कुटुंबाने शेवटी अत्यंत कठीण निर्णय घेतला. मृत बैलाच्या जागी स्वतः हौसाबाई यांनी नांगराचे जू आपल्या खांद्यावर घेतले आणि पतीला शेतीकामात साथ दिली.



गायकवाड कुटुंबाची पार्श्वभूमी अत्यंत गरिबीची आहे. स्वतःच्या मालकीची एक एकरही जमीन नसताना हे कुटुंब मागील अनेक वर्षांपासून दुसऱ्याची जमीन बटईने घेऊन तब्बल दहा एकर क्षेत्र कसते आहे. याच शेतीच्या जीवावर त्यांनी आपल्या चार मुलींची लग्ने करून दिली आणि दोन मुलांचे शिक्षण पूर्ण केले. मशागतीपासून ते बी-बियाणांपर्यंतचा संपूर्ण खर्च स्वतः करायचा आणि येणाऱ्या उत्पन्नातील मोठा वाटा जमीन मालकाला द्यायचा, अशा दुहेरी कात्रीत हे कुटुंब अडकले आहे. रस्त्याने जाणाऱ्या एका व्यक्तीने शेतातील हा विदारक प्रसंग कॅमेऱ्यात कैद केला आणि पाहता पाहता हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. ही घटना सरकारच्या आणि प्रशासनाच्या डोळ्यात अंजन घालणारी असून, या सारख्या पीडित शेतकरी कुटुंबांना शासनाने मदत करावी, अशी मागणी आता सर्व स्तरातून जोर धरू लागली आहे.

हेही वाचा