कळंगुट येथे पर्यटक महिलांचे व्हिडिओ काढणाऱ्या पर्यटकावर पोलिसांची कारवाई

मोबाईलमध्ये आढळले अनेक व्हिडिओ, प्रतिबंधात्मक कारवाई

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
10 hours ago
कळंगुट येथे पर्यटक महिलांचे व्हिडिओ काढणाऱ्या पर्यटकावर पोलिसांची कारवाई

पणजी : कळंगुट येथे समुद्रकिनारा परिसरात महिला पर्यटकांचे परवानगीशिवाय व्हिडिओ आणि फोटो काढणाऱ्या एका पर्यटकाला पोलिसांनी ताब्यात घेत प्रतिबंधात्मक कारवाई केली.

मिळालेल्या माहितीनुसार, काल गुरुवारी दुपारी १२.०५ वाजण्याच्या सुमारास पर्यटन पोलीस पथकातील हवालदार अरुण सावंत हे परिसरात गस्त घालत असताना एका व्यक्तीच्या संशयास्पद हालचाली त्यांच्या निदर्शनास आल्या. संबंधित व्यक्ती महिला पर्यटकांचे व्हिडिओ आणि फोटो काढत असल्याचे दिसून आले.

पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता; त्याने समाधानकारक उत्तरे दिली नाहीत. त्यानंतर त्याचा मोबाईल फोन तपासण्यात आला असता, त्यामध्ये विविध महिला पर्यटकांचे व्हिडिओ आणि फोटो आढळून आले. चौकशीदरम्यान संबंधिताने संबंधित महिला पर्यटकांच्या संमतीशिवाय हे व्हिडिओ आणि फोटो काढल्याची कबुली दिली.

संबंधित व्यक्तीने आपले नाव आकाश सरोज (वय ३२), रा. रायबरेली, उत्तर प्रदेश असे सांगितले. त्यानंतर संबंधित व्यक्तीला मोबाईल फोनसह कळंगुट पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. पुढील चौकशीनंतर पोलिसांनी त्याच्यावर प्रतिबंधात्मक कायद्यान्वये कारवाई करून अटक केली.

दारूच्या नशेत कृत्य

दरम्यान, पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पाच ते सहा जणांचा एक गट ३ दिवसांपूर्वी गोव्यात फिरायला आला होता. कळंगुट येथे दारूच्या नशेत फिरत असताना महिलांचे फोटो, व्हिडीओ काढत होते. या एकूण घटनेमुळे पर्यटनस्थळी महिला सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. 

हेही वाचा