बँक मॅनेजरच्या अतिउत्साहीपणामुळे कंपनीला २८.५० लाखांचा गंडा

पर्वरी एचडीएफसी बँकेतील प्रकार : पडताळणीपूर्वीच रक्कम हस्तांतरित

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
21st May, 10:26 pm

म्हापसा : बँक खातेधारक कंपनीच्या लेटरहेड आणि धनादेशाची सत्यता न पडताळताच २८.५० लाख रुपये हस्तांतरित केल्याने पर्वरी येथील एचडीएफसी बँकेची फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी बँकेच्या महिला व्यवस्थापकाने दिलेल्या तक्रारीवरून पर्वरी पोलिसांनी एका अज्ञात व्यक्तीविरुद्ध बनावटगिरी आणि फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

दोन दिवसांत उलगडला आर्थिक घोटाळा

हा आर्थिक फसवणुकीचा प्रकार २९ एप्रिल ते ३० एप्रिल २०२६ दरम्यान घडला. हा प्रकार उघडकीस येताच बँकेच्या महिला व्यवस्थापकाने ४ मे रोजी पर्वरी पोलिसांत धाव घेत याप्रकरणी रीतसर तक्रार दाखल केली.

संचालक असल्याचा बनाव

घटनेच्या दिवशी फिर्यादी बँक व्यवस्थापकाला संशयित आरोपीचा फोन आला. त्याने स्वतःची ओळख बँकेत खाते असलेल्या ‘इम्पोरियम ऑटोमोबाईल प्रायव्हेट लिमिटेड’ (स्कोडा शोरूम) या आस्थापनाचा संचालक म्हणून सांगितली आणि आस्थापनाच्या बँक खात्याचा क्रमांकही दिला.

वरील दोन दिवसांत वारंवार फिर्यादीला फोन करून संशयिताने आपल्याला तीन बँक खात्यांमध्ये तत्काळ रक्कम पाठवायची असल्याचे सांगितले. त्यासाठी आपण व्हॉट्सअॅपवर २८ लाख ५० हजार रुपये रकमेचा धनादेश पाठवत असून, तो क्लिअर करून ही रक्कम संबंधित बँक खात्यांमध्ये हस्तांतरित करावी, अशी विनंती त्याने केली.

बनावट लेटरहेडवरून व्यवहार

फिर्यादीने या व्यवहारासाठी कंपनीच्या लेटरहेडवर विनंती पत्र पाठवण्यास सांगितले. तेव्हा संशयिताने बनावट लेटरहेडवरील विनंती पत्र व्हॉट्सअॅपवर पाठवले आणि हे पत्र दुपारी बँकेत आणून देतो, असे भासवले. या धनादेशाची किंवा लेटरहेडची सत्यता न पडताळताच फिर्यादीने आरटीजीएस करत संबंधित खात्यातील २८ लाख ५० हजारांची रक्कम संशयिताने दिलेल्या तीन बँक खात्यांमध्ये हस्तांतरित केली.

कागदपत्रे बनावट असल्याचे उघड
1
संशयित आरोपी लेटरहेड व धनादेश घेऊन बँकेत न आल्याचे पाहून फिर्यादीने संबंधित धनादेश आणि कंपनीच्या लेटरहेडची पडताळणी केली.
2
पडताळणीनंतर दोन्ही कागदपत्रे बनावट असल्याचे उघड झाले आणि आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी तातडीने पोलिसांत तक्रार दाखल केली.
गुन्हा दाखल; तपास सुरू

तक्रारीनुसार पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या ३१८(४), ३१९(२), ३३६(३), ३३८ व ३४०(२) कलमांन्वये अज्ञात संशयिताविरुद्ध गुन्हा नोंद केला आहे. सध्या पोलीस अधीक्षक विश्वेश कर्पे आणि निरीक्षक तुकाराम चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

#GoaNews #BankFraud #CyberCrime #FinancialFraud #HDFCBank #GoaPolice #CrimeNews #BreakingNews