कायद्यात दुरुस्ती करणाऱ्या अध्यादेशामुळे ११ पालिकांच्या निवडणुका स्थागित

पालिकांच्या प्रभाग फेररचनेची आधीची प्रक्रिया कालबाह्य

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
21st May, 10:24 pm
कायद्यात दुरुस्ती करणाऱ्या अध्यादेशामुळे ११ पालिकांच्या निवडणुका स्थागित

पणजी : सरकारने नगरपालिका कायद्यात दुरुस्ती करणारा अध्यादेश जारी केल्यामुळे कार्यकाळ संपलेल्या राज्यातील ११ नगरपालिकांच्या प्रभाग फेररचनेची आधीची प्रक्रिया कालबाह्य ठरली आहे. त्यामुळे प्रभाग फेररचनेची ही प्रक्रिया रद्द झाल्याची अधिसूचना जारी करण्यात आली आहे, असे राज्य निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे.

निवडणुकांपूर्वी प्रक्रियेत बदल

पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाल्याने ११ नगरपालिकांच्या निवडणुका मे महिन्यात होणे अपेक्षित होते. मात्र, आरक्षण आणि प्रभाग फेररचनेसाठी आवश्यक वेळ उपलब्ध व्हावा म्हणून सरकारने नगरपालिका निवडणुका पुढे ढकलल्या. राज्य निवडणूक आयोगाने मे महिन्यात निवडणुका घेण्यासाठी तयारी सुरू केली होती. त्यानुसार प्रभाग फेररचनेची प्रक्रिया पूर्ण होऊन प्रभागांची संख्या देखील निश्चित करण्यात आली होती.

नव्या अध्यादेशाचा परिणाम

दरम्यान, प्रभाग फेररचना आणि आरक्षणाचे अधिकार राज्य निवडणूक आयोगाकडे देण्यासंबंधीचा मसुदा जारी करून आरक्षण निश्चित करण्यासाठी नव्याने कालमर्यादा निश्चित करणारा अध्यादेश सरकारने लागू केला. त्यामुळे प्रभाग आरक्षण आणि फेररचनेची प्रक्रिया आयोगाला आता नव्याने सुरू करावी लागणार आहे.

लोकसंख्येच्या आधारे फेररचना

यापूर्वी प्रभाग फेररचना मतदारसंख्येच्या आधारे होत होती, मात्र आता ती लोकसंख्येच्या आधारे केली जाणार आहे. या बदलामुळे नव्या प्रक्रियेनुसार प्रभाग निश्चिती आणि आरक्षणाचे काम पुन्हा सुरू करावे लागणार आहे.

हरकतींसाठी ३० दिवसांची मुदत
1
प्रभाग फेररचनेचा मसुदा जाहीर झाल्यानंतर सूचना आणि हरकती मागवण्यात येतील.
2
हरकती सादर करण्यासाठी ३० दिवसांची मुदत दिली जाणार आहे.
3
ही मुदत संपल्यानंतर पुढील ३० दिवसांत प्रभागांची संख्या निश्चित केली जाईल.
4
आरक्षणाचा मसुदा जाहीर झाल्यानंतरही सूचना आणि हरकती नोंदवण्यासाठी स्वतंत्र मुदत दिली जाणार आहे.
या नगरपालिकांमध्ये निवडणुका

कार्यकाळ संपलेल्या पेडणे, वाळपई, डिचोली, म्हापसा, मुरगाव, मडगाव, कुंकळ्ळी, केपे, काणकोण, कुडचडे-काकोडा आणि सांगे नगरपालिकांच्या निवडणुका नव्या प्रक्रियेनुसार होणार आहेत.

#GoaNews #MunicipalElection #GoaPolitics #ElectionCommission #WardDelimitation #GoaMunicipality #LocalBodyElection #BreakingNews