न्यायालयाने सुनावली चार दिवसांची पोलीस कोठडी

मडगाव : घोगळ हाउसिंग बोर्ड येथील सुन्नी गुलिस्तान मशिदीचे उपाध्यक्ष अली खान यांच्या खून प्रकरणात फरार असलेल्या साहिल ऊर्फ 'स्पायकी' याला फातोर्डा पोलिसांनी अटक केली आहे. मुख्य संशयित अक्रम खान याला साहिलनेच चाकू पुरवल्याचा आरोप आहे. न्यायालयाने संशयिताला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
सुन्नी गुलिस्तान मशिदीच्या वादातून अली खान यांच्यावर ३० जानेवारी रोजी मशिदीबाहेर चाकूने हल्ला करण्यात आला होता. उपचारादरम्यान अली खान यांचा मृत्यू झाल्यानंतर फातोर्डा पोलिसांनी सात संशयितांना अटक केली होती. हल्ल्यासाठी वापरलेला चाकू पोलिसांनी आधीच जप्त केला आहे. मशिदीच्या व्यवस्थापनाचा ताबा आणि मिळणाऱ्या निधीच्या वादातून हा खून झाल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. पोलीस कोठडीत असताना अक्रम खान याने कपड्यांमध्ये लपवून ठेवलेल्या मोबाईलवरून तक्रारदार व इतरांना धमकावल्याचा प्रकारही समोर आला होता. पोलिसांनी झाडाझडती सुरू केली असता, संशयिताने पुरावा नष्ट करण्यासाठी सिमकार्ड चावून गिळले होते. हा सर्व कट पूर्वनियोजित होता, असे पोलिसांनी न्यायालयात सांगितले.
या प्रकरणातील संशयित निजामुद्दीन सय्यद, हुसेन खान, सक्रुद्दीन शेख यांच्यासह आलम सय्यद, लतीफ सय्यद व उबेद मकानदार यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे. मुख्य संशयित अक्रम खान याच्या पोलीस कोठडीत वाढ करण्यात आली आहे. दरम्यान, आलम सय्यद, लतीफ सय्यद आणि उबेद मकानदार यांनी जामिनासाठी अर्ज केला असून, त्यावर १२ फेब्रुवारी रोजी सुनावणी होणार आहे. तसेच सर्फराज मकानदार व मेहबूब मकानदार यांनी अटकपूर्व जामिनासाठी धाव घेतली असून, त्यांच्या अर्जावर ९ फेब्रुवारी रोजी सुनावणी होईल.
साहिल ऊर्फ स्पायकी हा घटनेनंतर फरार झाला होता. पोलीस तांत्रिक निगराणीद्वारे त्याच्या मागावर होते. अखेर मडगाव कदंब बसस्थानकाजवळून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. तपासासाठी अधिक माहिती मिळवण्यासाठी न्यायालयाने त्याला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.