सांताक्रूझ ग्रामसभेत दुर्दैवी घटना

पणजी : सांताक्रूझ पंचायतीच्या ग्रामसभेत आज एक अत्यंत दुर्दैवी आणि हृदयद्रावक घटना घडली. सभेमध्ये आपले म्हणणे मांडण्यासाठी उभे राहिलेले ७० वर्षीय ज्येष्ठ नागरिक ओलावियो फर्नांडिस यांचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण सांताक्रूझ परिसरात शोककळा पसरली असून ग्रामसभेवरही दुःखाचे सावट पसरले आहे.
नेमकी घटना काय?
सांताक्रूझ ग्रामपंचायतीची सभा सुरू असताना ओलावियो फर्नांडिस हे उपस्थित होते. सभेचे कामकाज सुरू असताना फ्लॅट हस्तांतरण शुल्काबाबत (Transfer Fees) त्यांना शंका विचारायची होती. त्यासाठी ते आपल्या जागेवरून उभे राहिले, मात्र प्रश्न विचारण्यापूर्वीच त्यांना अचानक अस्वस्थ वाटू लागले आणि ते जागीच कोसळले. त्यांच्या अचानक कोसळण्याने सभागृहात एकच खळबळ उडाली. उपस्थित असलेल्या ग्रामस्थांनी आणि पंचायत सदस्यांनी त्यांना मदत करण्याचा प्रयत्न केला.
रुग्णवाहिका वेळेवर न पोहोचल्याचा आरोप फर्नांडिस कोसळल्यानंतर उपस्थितांनी तातडीने १०८ रुग्णवाहिका सेवेला पाचारण केले. मात्र, स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, रुग्णवाहिका वेळेवर घटनास्थळी पोहोचू शकली नाही. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून आणि वेळ वाया न घालवता, स्थानिक नागरिकांनी फर्नांडिस यांना स्वतःच्या खाजगी वाहनाने बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात (जीएमसी) नेले. मात्र, दुर्दैवाने रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली. डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले.
ओलावियो फर्नांडिस हे सांताक्रूझमधील एक सुजाण नागरिक म्हणून ओळखले जात होते. ते कृषी खात्यातील निवृत्त कर्मचारी होते. गावातील प्रश्नांबाबत ते नेहमीच जागरूक असत. अशा प्रकारे लोकशाहीच्या व्यासपीठावर आपल्या हक्काचा प्रश्न मांडत असतानाच त्यांचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.
बातमी अपडेट होत आहे.