
पणजी : गोव्यातील टपाल कार्यालयातील ग्रामीण डाक सेवकांसाठी कोकणी भाषेचे ज्ञान सक्तीचे करण्यात आले आहे. याबाबतची अधिसूचना सरकारने जारी केली आहे. या निर्णयामुळे ग्रामीण डाक सेवक पदांसाठी अर्ज करण्यास इच्छुक असणाऱ्या गोमंतकीयांसह टपाल सेवेवर अवलंबून असलेल्या जनतेलाही मोठा दिलासा मिळाला आहे.
ग्रामीण डाक सेवक पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी दहावीत मराठी किंवा कोकणी विषय घेऊन परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. जे उमेदवार मराठी विषय घेऊन दहावी उत्तीर्ण झाले आहेत, त्यांना कोकणी भाषेचे ज्ञान असणे अनिवार्य आहे. दहावीत कोकणी विषय नसल्यास, कोकणी भाषेच्या ज्ञानाबाबत 'गोवा कोकणी अकादमी' किंवा सरकारने अधिकृत केलेल्या संस्थेकडून प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.
गोव्याचे टपाल खाते सिंधुदुर्ग सर्कलच्या कक्षेत येते. अनेकदा गोव्यात परराज्यातील ग्रामीण डाक सेवकांची नियुक्ती केली जाते. त्यांना स्थानिक कोकणी भाषा येत नसल्यामुळे घरोघरी पत्रे पोहोचवताना अडचणी येतात. त्यामुळे पोस्टमन गोमंतकीय असावेत, अशी मागणी जनतेकडून सातत्याने होत होती. गोव्यातील पोस्टमनना कोकणी भाषा अवगत असावी, यासाठी आता भरती प्रक्रियेत कोकणीचे ज्ञान सक्तीचे केले आहे.
या संदर्भात राज्य सरकारने केंद्र सरकारला पत्र पाठवले होते. तसेच मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केंद्रीय दळणवळण खात्याच्या मंत्र्यांकडेही या विषयावर चर्चा केली होती. टपाल खात्याने गोव्यासाठी भरती नियमांत बदल केल्यानंतर आता राज्य सरकारने ही अधिसूचना जारी केली आहे.