पंचायत मंडळावर प्रश्नांचा भडिमार; टप्प्याटप्प्याने कर वाढवण्याची मागणी

मडगाव : आके बायश पंचायतीकडून घरपट्टीसह व्यापारी आस्थापनांकडून घेण्यात येणारा कर १० रुपये प्रति चौरस मीटरवरून थेट १०० रुपये केल्याने स्थानिकांनी संताप व्यक्त केला. रविवारी झालेल्या ग्रामसभेत नागरिकांनी पंचायत मंडळाला धारेवर धरत प्रश्नांचा भडिमार केला. ही करवाढ अन्यायकारक असून, त्याबाबतचा फेरप्रस्ताव गटविकास अधिकाऱ्यांकडे (बीडीओ) पाठवावा आणि कर वाढवताना ती टप्प्याटप्प्याने करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली.
आके बायश पंचायतीची ग्रामसभा रविवारी पंचायत सभागृहात पार पडली. यावेळी भटक्या कुत्र्यांच्या समस्येवरूनही नागरिकांनी आक्रमक पवित्रा घेतला. पहाटे आणि रात्री फिरण्यासाठी जाणाऱ्या नागरिकांच्या तसेच वाहनांच्या मागे कुत्रे धावण्याचे प्रकार वाढल्याने सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. यावर तोडगा काढण्यासाठी संबंधित एजन्सी नेमण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे पंचायत मंडळाने सांगितले.
याव्यतिरिक्त, घरातच आरोग्य तपासणी प्रयोगशाळेला (लॅब) देण्यात आलेल्या परवानगीबाबत नागरिकांनी विचारणा केली. ज्यांना तात्पुरते परवाने दिले आहेत, त्यांना अंतिम परवान्यासाठी नोटीस बजावण्यात यावी आणि ग्रामसभेच्या संमतीशिवाय यापुढे कोणालाही परवानगी देऊ नये, अशी मागणी करण्यात आली. या सभेत पंचायतीच्या २.७५ कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पाला मंजुरी देण्यात आली. हा निधी सांस्कृतिक कार्यक्रम, क्रीडा उपक्रम, कुत्र्यांचे निर्बिजीकरण आणि लसीकरणासाठी वापरण्यात यावा, अशा सूचना ग्रामस्थांनी केल्या.
व्यापार परवान्यांबाबत चर्चा करताना, ज्यांची थकबाकी आहे त्यांना नोटिसा पाठवल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर घरपट्टी वाढीचा मुद्दा उपस्थित झाला. १० रुपयांवरून थेट १०० रुपये दर लावणे सध्याच्या आर्थिक स्थितीत योग्य नाही. ऑनलाइन विक्रीमुळे आधीच स्थानिक व्यावसायिकांवर परिणाम झाला आहे. त्यामुळे सुरुवातीला १० रुपयांवरून २० रुपये अशी वाढ करावी आणि दोन वर्षांनंतर पुन्हा आढावा घ्यावा, असा प्रस्ताव नागरिकांनी मांडला. यानुसार, सध्याची करवाढ स्थगित ठेवून बीडीओ कार्यालयाकडे सुधारित प्रस्ताव पाठवण्याचे पंचायत मंडळाने मान्य केले.