ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात ट्रकच्या चाकाखाली चिरडून दुचाकीस्वार ठार

बिट्स पिलानी कॅम्पससमोर घडली घटना. पळून गेलेला ट्रकचालक वेर्णा पोलीस स्थानकात शरण.

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
08th February, 11:17 am
ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात ट्रकच्या चाकाखाली चिरडून दुचाकीस्वार ठार

पणजी : गोव्यातील राष्ट्रीय महामार्ग १७-बी वर रविवारी सकाळी एक भीषण अपघात घडला. बिट्स पिलानीच्या गोवा कॅम्पसच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर एका दुचाकीस्वाराला ट्रकने चिरडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. प्रवीण शिरोलकर (३२) असे या मृत तरुणाचे नाव असून, तो वास्को येथील बायणा भागात राहत होता. मुळचा कोल्हापूरचा असलेला प्रवीण वेर्णा औद्योगिक वसाहतीमधील 'सिप्ला' कंपनीत कार्यरत होता. कामावर जात असतानाच काळाने त्याच्यावर घाला घातला.

नेमकी घटना काय?

 मिळालेल्या माहितीनुसार, प्रवीण शिरोलकर आपल्या दुचाकीवरून वेर्णाच्या दिशेने जात होता. त्याचवेळी एकाच दिशेने एक ट्रक आणि एक टँकर देखील प्रवास करत होते. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, या दोन अवजड वाहने जात असताना  प्रवीणने ओव्हरटेक प्रयत्न केला. मात्र, या प्रयत्नात त्याचा दुचाकीवरील ताबा सुटला आणि तो थेट ट्रकच्या मागच्या चाकाखाली आला. ट्रकचे चाक डोक्यावरून गेल्याने प्रवीणचा जागीच अंत झाला.

अपघातानंतर ट्रकचालकाचे पलायन आणि शरणागती अपघात झाल्यानंतर ट्रकचालकाने वाहन न थांबवता घटनास्थळावरून पलायन केले. यामुळे काही काळ महामार्गावर तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, काही वेळाने संबंधित ट्रकचालक स्वतःहून वेर्णा पोलीस स्थानकात शरण आला. पोलिसांनी तातडीने ट्रक ताब्यात घेतला आहे. ट्रकचालकाची ओळख आणि इतर तपशील अद्याप समोर आले नसून पोलीस तपास सुरू आहे.

वाहतुक शिस्तीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर 

वेर्णा पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला असून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आला आहे. महामार्गावर अवजड वाहनांच्या वेगावर आणि एकंदरीत वाहतूक शिस्त नसल्याने अशा अपघातांच्या संख्येत वाढ होत आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली आहे.  वेर्णा पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून, नेमकी चूक कोणाची होती याचा शोध सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे घेतला जात आहे.


हेही वाचा