राज्यातील यूपीआय व्यवहारांत वर्षात ३ हजार कोटींची वाढ

केंद्रीय अर्थ खात्याचा अहवाल : देेशात यूपीआयद्वारे सर्वाधिक व्यवहार महाराष्ट्रातून

Story: पिनाक कल्लोळी |
11th January, 11:15 pm
राज्यातील यूपीआय व्यवहारांत वर्षात ३ हजार कोटींची वाढ

गोवन वार्ता
पणजी : यूपीआय अॅपद्वारे पेमेंट करणे हा पर्याय सुलभ झाला आहे. वापरण्यास सोपे, सुरक्षित असल्याने यूपीआय अॅपचा वापर वाढत आहे. यामुळे एका वर्षाच्या कालावधीत गोव्यात यूपीआय अॅपद्वारे झालेल्या व्यवहारात ३,२७५.८ कोटी रुपयांची वाढ (६.४८ टक्के) झाली आहे. २०२४ मध्ये राज्यात यूपीआय अॅपद्वारे ५० हजार ५०५ कोटी रुपयांचे व्यवहार झाले होते. २०२५ मध्ये ते वाढून ५३ हजार ७८१ कोटी रुपये झाले. केंद्रीय अर्थ खात्याने जारी केलेल्या अहवालांतून ही माहिती मिळाली आहे.
यूपीआय अॅपमध्ये विविध बँकांच्या अॅपसह भीमपे, गुगल पे, पेटीएम अशा अॅपचा समावेश आहे. मे महिनाशिवाय मागील दोन वर्षांत राज्यातील यूपीआय अॅपद्वारे पेमेंट करण्यात वाढ झाली आहे. राज्यात २०२५ मध्ये जानेवारी, एप्रिल, ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यांत यूपीआयद्वारे ५ हजार कोटी रुपयांहून अधिक रुपयांचे व्यवहार झाले होते. तर उर्वरित महिन्यांत हे व्यवहार ४ ते ४.५ हजार कोटी रुपयांपर्यंत होते. २०२४ मध्ये डिसेंबर वगळता अन्य कोणत्याही महिन्यात यूपीआय व्यवहार ५ हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक नव्हते.
वर्ष २०२५ मध्ये यूपीआयद्वारे पेमेंट करण्यात गोवा देशात २२ व्या स्थानी राहिला. संपूर्ण देशाचा विचार करता वरील कालावधीत महाराष्ट्रातून सर्वाधिक यूपीआय अॅपद्वारे व्यवहार झाले. यानंतर उत्तर प्रदेश, कर्नाटक, तेलंगणा या राज्यांचा क्रमांक लागतो. नागालँड, मिझोरम, त्रिपुरा येथे यूपीआय व्यवहारांचे प्रमाण तुलनेने कमी होते. २०२४ आणि २०२५ मध्ये देशभरात सर्वाधिक यूपीआय व्यवहार हे ग्रोसरी दुकाने अथवा सुपर मार्केटमध्ये झाल्याचे अहवालात म्हटले आहे.
दिवसाला ११ लाख ट्रान्झेक्शन्स
अर्थ खात्याच्या आकडेवारीनुसार, गोव्यात २०२५ मध्ये झालेल्या एकूण व्यवहारांसाठी ४१.०२ कोटी ट्रान्झेक्शन्स झाले आहेत. याचाच अर्थ दिवसाला सरासरी ११.२३ लाख यूपीआय अॅप ट्रान्झेक्शन्स झाले आहेत.
डिसेंबरमध्ये सर्वाधिक व्यवहार
दोन वर्षांच्या कालावधीत डिसेंबरमध्ये यूपीआयद्वारे सर्वाधिक व्यवहार झाल्याचे स्पष्ट झाले आहे. डिसेंबर २०२४ मध्ये ५,४२७.०६ कोटी रुपयांचे व्यवहार यूपीआयद्वारे झाले होते. डिसेंबर २०२५ मध्ये ५,९९०.२१ कोटी रुपयांचे व्यवहार यूपीआयद्वारे झाले आहेत. डिसेंबर महिन्यात राज्यात येणाऱ्या पर्यटकांची संख्या अधिक असल्याने या महिन्यात अन्य महिन्यांपेक्षा अधिक यूपीआय व्यवहार झाले.