परवान्याबाबत पोलिसांकडून सखोल तपास

म्हापसा : हडफडे येथील ‘बर्च बाय रोमिओ लेन’ नाईट क्लब आग दुर्घटनेप्रकरणी हणजूण पोलिसांनी तपासाची गती वाढवली आहे. पोलिसांनी हडफडे-नागवा पंचायतीच्या तीन पंच सदस्यांसह बार्देश गटविकास अधिकाऱ्यांची (बीडीओ) जबानी नोंदवून घेतली. दरम्यान, या प्रकरणी अटक झालेल्या चार संशयितांच्या पोलीस कोठडीत न्यायालयाने आणखी पाच दिवसांची वाढ केली.
पंच आणि बीडीओंची चौकशी
पोलिसांनी पंचायत कार्यालयातून ताब्यात घेतलेल्या क्लबशी संबंधित सर्व फाईल्स आणि कागदपत्रांची छाननी सुरू केली आहे. याच अनुषंगाने उपसरपंच सुषमा नागवेकर, पंच सदस्य विनंती मोरजकर व पंच सदस्य स्टेफी फर्नांडिस यांची चौकशी करत त्यांचा जबाब नोंदवण्यात आला. तसेच बार्देश गटविकास अधिकारी प्रथमेश शंकरदास यांचीही जबानी पोलिसांनी नोंदवली. पंचायतीने कोणत्या आधारावर क्लबला परवाना दिला होता, याची सविस्तर माहिती पोलिसांनी या जबाबातून घेतली.
कोठडीत पाच दिवसांची वाढ
या अग्नितांडव प्रकरणी पोलिसांनी अटक केलेले क्लबचे व्यवस्थापक राजीव निमाई मोडक (४९, दिल्ली), प्रियांशू कृष्णकुमार ठाकूर (३२, दिल्ली), राजवीर रूद्रनाथ सिंघानिया (३२, उत्तर प्रदेश) व विवेक चंद्रभान सिंग (२७, उत्तर प्रदेश) या संशयितांना शनिवारी म्हापसा न्यायालयात हजर केले. यावेळी न्यायालयाने त्यांच्या पोलीस कोठडीत आणखी पाच दिवस वाढ करण्यावर शिक्कामोर्तब केले.
तपासात पूर्ण सहकार्य
पोलिसांसमोर जबाब नोंदवल्यानंतर उपसरपंचांसमवेत तिन्ही महिला पंच सदस्यांनी प्रतिक्रिया दिली. "आम्ही पोलीस तपासात पूर्ण सहकार्य करत आहोत. याशिवाय इतर गोष्टींवर आम्ही सध्या भाष्य करू शकत नाही," असे त्यांनी स्पष्ट केले.