
नवी दिल्ली : गोव्यातील (Goa) हडफडे येथे 'बर्च बाय रोमियो लेन' ( Birch by Romeo Lane) या नाईट (Night Club) क्लबला लागलेल्या आगीत २५ जण ठार झाल्यानंतर थायलंडमध्ये (Thailand) पळून गेलेले सौरभ व गौरव लुथरा या मालकांना तेथे ताब्यात घेतले. फुकेट येथील स्थानिक पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. या दोघांनाही भारतात आणण्यासाठी प्रत्यार्पणाची प्रक्रिया सुरू आहे.
त्यांच्या ‘बर्च बाय रोमियो लेन’ या नाईट क्लबला लागलेल्या आगीत २५ जण ठार झाले होते. त्यानंतर काही तासातच हे दोघेही थायलंडला फुकेट येथे पळून गेले होते. त्यानंतर या दोघांनाही पकडण्यासाठी गोवा पोलिसांचे प्रयत्न सुरू होते. त्यांच्या विरोधात इंटरपोलची ब्लू कॉर्नर नोटीस जारी करण्यात आली होती,
गोवा पोलिसांनी केंद्र सरकारशी पत्रव्यवहार करून नियमांनुसार भारतीय पासपोर्ट निलंबित केले होते. पासपोर्ट रद्द करण्यासाठीही प्रयत्न सुरू होते. केंद्र सरकारने थायलंड सरकारशी पत्रव्यवहार केल्यानंतर लुथरा बंधूंना थायलंड येथील फुकेट पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यानंतर भारतात आणण्यासाठी प्रक्रिया सुरू आहे. या दोघांनी दिल्ली येथील रोहिणी न्यायालयात अंतरिम जामिनासाठी केलेले अर्ज फेटाळण्यात आले.