अर्ज माघारीनंतर आज दुपारी होणार चित्र स्पष्ट

प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : राज्यात २० डिसेंबर रोजी जिल्हा पंचायत (झेडपी) निवडणूक होत आहे. निवडणुकीसाठी दाखल उमेदवारी अर्जांची बुधवारी छाननी पार पडली. उत्तर गोव्यातून १ आणि दक्षिण गोव्यातून ६ अर्ज फेटाळण्यात आले. त्यामुळे आता उत्तरेतून १५८ आणि दक्षिणेतून १६२ अर्ज ग्राह्य ठरले आहेत. गुरुवारी दुपारी दोनपर्यंत अर्ज मागे घेण्याची मुदत आहे. त्यानंतर जिल्हा पंचायत निवडणुकीतील उमेदवारांचे चित्र स्पष्ट होणार आहे.
बुधवारी छाननीत उत्तरेतून शिवोली मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार फ्रान्सिसको झेवियर फर्नाडिस यांचा अर्ज बाद ठरला. दक्षिण गोव्यातून बेतकी खांडोळा मतदारसंघातील संजीवनी खुशाली तळकर यांचा एक अर्ज बाद झाला आहे. त्यांनी भाजप आणि अपक्ष असे दोन अर्ज दाखल केले होते. बोरी मतदारसंघातून प्रणोती प्रेमानंद शेटकर यांनीही काँग्रेस आणि अपक्ष, असे २ अर्ज दाखल केले होते. त्यांचा एक अर्ज बाद ठरला आहे. पैंगीण मतदारसंघातील अपक्ष उमेदवार प्रकाश अनंत वारीक, नुवेतील ‘आप’चे उमेदवार जोआकिना क्रास्टो आणि काँग्रेसचे उमेदवार मॅकमिलन ब्रागांझा यांचे अर्ज बाद ठरले आहेत.
जिल्हा पंचायत निवडणुकीत आता उत्तर आणि दक्षिण गोव्याच्या एकूण ५० मतदारसंघांतून ३२० उमेदवारांचे अर्ज ग्रह्या ठरले आहेत. यामध्ये उत्तर गोव्यातील १५८ आणि दक्षिण गोव्यातील १६२ अर्जांचा समावेश आहे.