गोवा : गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्यांच्या हालचालींवर असणार करडी नजर!

बायणा दरोड्यानंतर मुख्यमंत्र्यांनी घेतला कायदा सुव्यवस्थेचा आढावा

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
3 hours ago
गोवा : गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्यांच्या हालचालींवर असणार करडी नजर!

पणजी : वाढत्या चोऱ्या व बायणा येथील सशस्त्र दरोड्याच्या (dacoity in Baina Goa) पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (Pramod Sawant) यांनी पोलीस अधिकाऱ्यांची (Goa Police) बैठक घेऊन कायदा सुव्यवस्था स्थितीचा आढावा घेतला. रात्रीची गस्त तसेच नाकाबंदी वाढवितानाच गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्यांच्या हालचालींवर पोलिसांची करडी नजर असणार आहे. दरोड्यासारखे प्रकार घडू नयेत, म्हणून मुख्यमंत्र्यांनी सुरक्षाविषयक विविध आदेश पोलिसांना दिले आहेत.
बायणा-वास्को येथील सशस्त्र दरोड्याला दिवस उलटल्यावरही छडा लावण्यात पोलिसांना यश आलेले नाही. बायणासह सांताक्रूझ येथेही भरदिवसा फ्लॅट फोडण्याचा प्रकार घडला. चोऱ्या व दरोड्यांमुळे राज्यात सामान्य जनतेमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. विरोधकांनी कायदा सुव्यवस्था ढासळल्याचे आरोप करतानाच सामान्यांचे जीवन असुरक्षित बनल्याची टीका केली आहे.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यानी बुधवारी रात्र आल्तिनो येथील जीआरपी सभागृहात वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीला पोलीस महासंचालक आलोक कुमार, पोलीस महानिरीक्षक के. सी. चौरासिया, पोलीस अधिक्षक व काही निवडक पोलीस निरीक्षक उपस्थित होते. सर्वप्रथम गुन्हे नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांकडून मुख्यमंत्र्यांनी सूचना घेतल्या. त्यानंतर त्यानी महत्त्वाचे आदेश दिले. अपघातांवर नियंत्रण आणण्याबाबतही पोलिसांना सूचना दिल्या.

यापुढे डोळ्यात तेल घालून गस्त...
- राज्यात ठिकठिकाणी गुन्हे नोंद झालेल्या व गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्ती आहेत. या व्यक्तींच्या हालचालींवर नजर ठेवा. आवश्यकता भासल्यास पोलीस स्थानकात बोलावून त्यांची चौकशी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
- चोऱ्या व दरोडे रात्रीच्या वेळीच घडतात. त्यामुळे रात्रीची गस्त आणखी वाढविली जाईल. बसस्थानके व मोक्याच्या ठिकाणी पोलिसांची फिरती गस्त असेल.
- रात्रीच्या वेळी वाहने तसेच संशयास्पद व्यक्तींच्या तपासणीसाठी नाकाबंदी केली जाईल.
याशिवाय रहदारीच्या ठिकाणची सीसीटीव्ही फुटेज तपासणे, बीट पद्धत अधिक कार्यक्षम करण्यावर भर दिला जाईल.
- सीमेवरील तपासणी कडक करण्याबरोबर भाडेकरू तपासणी मोहिमेवर आणखी भर दिला जाणार आहे.

बायणा येथील दरोड्याचा तपास सुरू असून लवकरच छडा लावण्यात पोलिसाना यश येईल. पोलीस निरीक्षक व पोलीस उपअधीक्षक बुधवारी दिवसभर दरोड्याच्या स्थळी होते. सखोल तपास सुरू आहे.
- डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री 

हेही वाचा