म्हणाले-बेरोजगारी, योजनांचा विलंब हे महत्त्वाचे मुद्दे

मडगाव: राज्यातील सर्व जिल्हा पंचायत मतदारसंघांत लोकांच्या बैठका घेऊन लोकांची मते लक्षात घेत पक्षाचा जाहीरनामा तयार केला जाईल. लोकांच्या समस्या व मते जाणून घेतली जात आहेत. कोणत्या विकासकामांसाठी खर्च करायला हवा, हे जाणून घेतले जाईल. तसेच, जिल्हा पंचायत सदस्यांनी केलेल्या विकासकामांच्या आधारावरच विधानसभा निवडणुकीत मते मागण्यात येतील, असे आमदार व्हेंझी व्हिएगस यांनी सांगितले.

मडगाव येथे पत्रकार परिषद घेत आमदार व्हेंझी यांनी स्पष्ट केले की, जिल्हा पंचायत निवडणुकीत आम आदमी पक्षाचा जाहीरनामा हा लोकांच्या मतांनुसार तयार केला जाईल. त्यांनी सांगितले की, आतापर्यंत लोकांसोबत झालेल्या बैठकांमध्ये युवकांनी बेरोजगारीचा मुद्दा प्रकर्षाने मांडला. पैसे देऊन नोकऱ्यांची विक्री होत असल्याने योग्य उमेदवारांना संधी मिळत नाही. ज्येष्ठ नागरिकांना वेळेत योजनेचे पैसे मिळत नाहीत, तसेच डीडीएसएसवाय कार्डाचे नूतनीकरण वेळेत होत नाही.

आमदार व्हेंझी पुढे म्हणाले की, निवडणुकीत मतदार हा राजा असतो, त्यामुळे लोकांमध्ये जाऊन लोकांचा जाहीरनामा तयार केला जाईल. या बैठकांतून लोकांच्या समस्या जाणून घेतल्या जात आहेत. जिल्हा पंचायत निवडणुकीत 'आप'च्या उमेदवारांना निवडून आणण्यात मतदारांनी सहकार्य करावे. जिल्हा पंचायत सदस्यांकडून होणारे काम पाहून पुढील निवडणुकांत 'आप'ला सहकार्य करावे. 'आप' विकासकामांचे राजकारण करत असून, विकासकामांवर मते मागत आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. बाणावली, कोलवा आणि इतर ठिकाणी बैठका घेण्यात आल्या असून, दोन दिवसांत प्रत्येकी चार बैठका झाल्या आहेत. या बैठकीतून लोकांची मते जाणून घेत, त्यांना कोणत्या सोयी-सुविधा हव्या आहेत, हे जाणून घेतले जात आहे आणि त्याचा समावेश जाहीरनाम्यात केला जाईल, असेही त्यांनी सांगितले.

इतर उमेदवारांचे काय म्हणाले ?
यावेळी जोसेफ पिमेंता यांनी सांगितले की, आम आदमी पक्षाकडून ते पुन्हा एकदा जिल्हा पंचायत निवडणूक लढवत असून, लोकांची मते जाणून घेत जाहीरनामा तयार केला जात आहे. इसाका फर्नांडिस यांनी सांगितले की, त्यांनी असोळणा सरपंच म्हणून काम केले असून, 'आप' पक्षाकडून वेळ्ळी मतदारसंघातून जिल्हा पंचायत निवडणूक लढवत आहेत. मतदारांनी मतप्रदर्शन करून यासाठी सहकार्य करावे, असे त्यांनी सांगितले. आंतानिओ फर्नांडिस यांनी सांगितले की, त्यांनी तीन वेळा पंचायत निवडणूक लढवून जिंकलेली आहे. दोन वेळा सरपंच व एकदा उपसरपंचपदी काम केले आहे. 'आप'चे काम पाहून पक्षप्रवेश करत जिल्हा पंचायत निवडणूक लढत आहेत आणि लोकांनी 'आप'ला पाठिंबा द्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
