
पणजी : गोव्यात (Goa )युवकांमध्ये ह्रदयविकाराचे झटके (Heart attacks) व स्ट्रोकचे (strokes) प्रमाण वाढत असल्याची माहिती एका डेटातून पुढे आली आहे.
वाढते ह्रदयविकाराचे झटके, स्ट्रोक रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून डॉक्टर नियमित रक्तदाब व कोलेस्टेरॉलची तपासणी करण्यास सूचवत आहेत.
‘सुशेगाद’ गोमंतकीय आता ह्रदयविकार, स्ट्रोकच्या विळख्यात सापडत आहेत. ४० वर्षांखालील युवकांमध्ये ह्रदयविकार, स्ट्रोकचे प्रमाण वाढत आहे.
आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या (Health and Family Welfare Ministry) अधिकृत आकडेवारीनुसार, देशभरातील पाचपैकी एक हृदयविकाराचा रुग्ण आता ४० वर्षांपेक्षा कमी वयाचा आहे.
गोव्यातही हाच ट्रेंड आहे आणि वैद्यकीय तज्ज्ञ जीवनशैली, उच्च ताण, धूम्रपान, मद्यपान आणि चुकीच्या आहाराच्या सवयी या स्थितीला कारणीभूत असल्याचे सांगत आहेत.
जीएमसीत २ वर्षांत २९०४ प्रकरणे नोंद
गोवा वैद्यकीय महाविद्यालय हॉस्पिटलातील (जीएमसी) (GMCH) (Goa Medical College and Hospital) एका वरिष्ठ डॉक्टरने सांगितले की, गेल्या दोन वर्षांत हृदयविकाराच्या झटक्यांची दोन हजार, ९०४ प्रकरणे नोंदवली गेली आहेत. हृदयाशी संबंधित आजारांमुळे दररोज चार रुग्णांना दाखल केले जात आहे.
२०२३ च्या तुलनेत २०२४ मध्ये १४.३ टक्क्यांनी वाढ
गोव्याच्या आरोग्य सेवा संचालनालयाच्या नोंदींनुसार २०२३ च्या तुलनेत २०२४ मध्ये हृदयविकाराच्या घटनांमध्ये १४.३% वाढ झाली आहे. बार्देश तालुक्यात सर्वात जास्त घटना घडल्या आहेत.
गोव्यातील अनेक डॉक्टरांनी या वाढत्या प्रमाणासंदर्भात चिंता व्यक्त करताना, वृद्ध रुग्णांबरोबरच तरुण बळींचे प्रमाण सातत्याने वाढत असल्याचे सांगितले.
१.७ लाख लोकांची तपासणी : ५ हजार ह्रदयविकाराच्या झटक्याची प्रकरणे
जीएमसीच्या डेटाबरोबरच हृदयविकाराच्या शोध घेण्यासाठी सरकारी उपक्रम असलेल्या एसटीईएमआय कार्यक्रमात गेल्या चार वर्षांत गोव्यात ५ हजार हृदयविकाराच्या झटक्याची प्रकरणे नोंदवली आहेत. ज्यामध्ये १.७ लाखांहून अधिक लोकांची तपासणी करण्यात आली आहे.
डीएचएस सूत्रांनी सांगितले की, या वर्षी देखील शिबिरांमध्ये ‘रिअल टाइम’मध्ये अनेक प्रकरणे आढळून आली. ही प्रकरणे त्वरित हाताळण्यात आली.
२० ते ३० वयोगटाने तपासणी करणे गरजेचे
आता २० आणि ३० वयोगटातील युवकांनी देखील रक्तदाब आणि कोलेस्टेरॉलची नियमित तपासणी करण्याची वेळ आली असल्यचे डॉक्टर सांगत आहेत. जीवघेणी आपत्कालीन परिस्थिती उद्भवण्यापूर्वी तपासणी करून खबरदारी घेणे गरजेचे असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
आरोग्यदायी आहार, नियमित व्यायाम आणि तंबाखू आणि अल्कोहोलचा वापर कमी करण्यासाठी डीएचएसकडून सार्वजनिक आरोग्य मोहिमा देखील तीव्र केल्या जात आहेत.
४७ टक्के नैसर्गिक मृत्यू ह्रदयरोग, कर्करोग, मधुमेह मुळे
दरम्यान, २०२४-२५ च्या आर्थिक सर्वेक्षणात असे दिसून आले आहे की, गोव्यात ४७% नैसर्गिक मृत्यू हे हृदयरोग, कर्करोग आणि मधुमेह यांसारख्या असंसर्गजन्य आजारांमुळे होतात, ज्यामुळे या संकटाची तीव्रता अधोरेखित होते.