वास्को, मडगाव, पणजी अग्निशमन दलाच्या प्रयत्नांमुळे औद्योगिक वसाहतीकडे आग पसरली नाही; लाखो रुपयांचे नुकसान

वास्को: झुआरीनगर, सांकवाळ येथील बिर्ला परिसरातील एका मोठ्या भंगारअड्ड्याला आज, बुधवारी १९ नोव्हेंबर पहाटे ४:४७ च्या सुमारास भीषण आग लागली. या आगीत भंगारअड्डा पूर्णपणे जळून खाक झाला. सुदैवाने, या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
आगीची तीव्रता जास्त असल्याने परिसरातील नागरिकांमध्ये घबराट पसरली होती. धुराचे मोठे लोट आकाशात दिसत असल्याने आजूबाजूच्या भागात दृश्यमानता कमी झाली होती. घटनेची माहिती मिळताच, वास्को अग्निशमन दल तातडीने घटनास्थळी दाखल झाले. मात्र आगीचे स्वरूप मोठे असल्याने मदतीसाठी मडगाव अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. तसेच, पणजी येथील जवानांनीही मदतकार्य केले.
आठ तासांपासून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरू
अग्निशमन दलाच्या जवानांना भंगारअड्ड्यातील ज्वलनशील टाकाऊ मालामुळे निर्माण झालेल्या तीव्र उष्णतेशी आणि ज्वालांशी मुकाबला करावा लागला. अग्निशमन दलाच्या पथकांचेअथक प्रयत्न सुरू असून तब्बल आठ तासांनंतरही आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवता आलेले नाही.

या जवानांच्या तत्पर आणि प्रभावी कारवाईमुळे आग बाजूच्या औद्योगिक वसाहतीतील युनिट्सकडे पसरण्यापासून रोखण्यात यश आले. यामुळे संभाव्य मोठी दुर्घटना टळली. या परिसरात अंदाजे ४०-५० छोटेमोठे भंगारअड्डे आहेत. अग्निशामक दलाने वेळीच प्रतिसाद दिला नसता तर भीषण दुर्घटना घडली असती. आगीमुळे भंगारअड्ड्याचे मोठे नुकसान झाले असून, नुकसानीचा नेमका आकडा तपासणीनंतर स्पष्ट होईल. आग नेमकी कशामुळे लागली, याबद्दल तपास सुरू आहे.
बातमी अपडेट होत आहे.