सत्तरीतील पहिली जत्रा असल्याने मोठी गर्दी अपेक्षित; 'दिवज' व 'अग्नी दिव्य' हे उत्सवाचे मुख्य आकर्षण

सत्तरी: जागृत देवस्थान म्हणून प्रसिद्ध असलेल्या कोपार्डे, सत्तरी येथील श्री ब्राह्मणी महामाया देवीचा वार्षिक दिवजोत्सव उद्या, गुरुवार २० नोव्हेंबर २०२५ रोजी मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे. सत्तरी तालुक्यात ही पहिलीच जत्रा असल्याने देवीच्या दर्शनासाठी, ओटी भरण्यासाठी आणि नवस फेडण्यासाठी मोठ्या संख्येने भाविकांची उपस्थिती लाभेल.

दिवजोत्सवानिमित्त दिवसभर मंदिरात विविध धार्मिक विधी पार पडतील. यामध्ये सकाळी संकल्प, महाभिषेक, श्रींचे दर्शन, नवस फेडणे, तळी ओट्या भरणे आणि सुवासिनींचे धार्मिक कार्यक्रम होतील. रात्री ११.३० वाजता श्री राष्ट्रोळी कला क्रिडा ग्रामविकास मंडळ, यशाडी-दोडामार्ग यांच्या वतीने 'देव नाही देव्हाऱ्यात' या दोन अंकी सामाजिक नाटकाचा प्रयोग सादर केला जाईल.उत्सवाचे मुख्य आकर्षण असलेले पहाटेचे विधी शुक्रवार, २१ नोव्हेंबर रोजी पहाटे ५.०० वाजता सुरू होतील. या वेळी सुवासिनींकडून दिवजासह मंदिर प्रदक्षिणा, त्यानंतर 'अग्नी दिव्य' हा विधी पार पडेल आणि भाविकांना देवीचा 'कौल प्रसाद' मिळेल.

या देवस्थानात त्वचारोगावर उपचार केले जातात. त्यामुळे त्वचेचे विकार असलेल्या रुग्णांसह अनेक भाविक या उत्सवात मोठ्या प्रमाणात सहभागी होतात. उत्सवाच्या निमित्ताने रात्री देवीच्या दर्शनासाठी आणि विविध धार्मिक कार्यांसाठी भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी अपेक्षित आहे . देवस्थान कमेटीने सर्व भाविक आणि भक्तांना या वार्षिक दिवजोत्सवात सहभागी होऊन देवीच्या दर्शनाचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.