म्हणाले-जिल्हा पंचायत निवडणुकीसाठी युतीची घोषणा लवकरच

पणजी: गोवा राज्यात होणाऱ्या जिल्हा पंचायत निवडणुकीत भाजपला पराभूत करण्यासाठी सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येणे गरजेचे आहे आणि हे काँग्रेसचे ठाम मत आहे, असे पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी स्पष्ट केले. त्यांनी सांगितले की, पक्षाच्या प्रदेश निवडणूक समितीच्या बैठकीत जिल्हा पंचायत उमेदवारांची नावे लवकरच मंजूर करून जाहीर केली जातील.
युतीची रणनिती अंतिम टप्प्यात
अमित पाटकर यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली की, राज्यातील सर्व ५० जागांवर युतीचे उमेदवार उभे असतील. ज्या मतदारसंघात जो पक्ष मजबूत आहे आणि जो पक्ष काम करतो, अशा जागांवर चर्चा आणि नियोजन करूनच युतीची घोषणा करण्यात येणार आहे. युती संदर्भात विविध पक्षांच्या प्रमुख नेत्यांसोबत आतापर्यंत तीन बैठका झाल्या असून, युतीची घोषणा लवकरच करण्यात येईल.
निवडणूक अधिकाऱ्यांवर नाराजी
निवडणुकीच्या तारखांबाबत पाटकर यांनी राज्य निवडणूक अधिकाऱ्यांवर नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले, पूर्वी १३ डिसेंबरला मतदान असल्याचे जाहीर केले आणि दोन दिवसांपूर्वी मतदानाची तारीख पुढे ढकलून २० डिसेंबर असल्याचे जाहीर केले. यामुळे राज्य निवडणूक अधिकारीच निवडणुकीसाठी तयार नसल्याचे दिसून येते.
कायदा-सुव्यवस्थेवरून सरकारला लक्ष्य
पाटकर यांनी राज्यातील वाढत्या दरोड्यांविषयी सरकार आणि पोलीस यंत्रणेवर नाराजी व्यक्त केली. उद्या २० नोव्हेंबर) राज्यात सुरू होणाऱ्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी, डिसेंबर महिन्यात होणाऱ्या सेंट फ्रान्सिस झेवियरच्या 'फेस्तासाठी' तसेच नवीन वर्षाच्या स्वागतासाठी गोव्यात येणाऱ्या देशी आणि परदेशी पर्यटकांना गोवा हे गुन्हेगारी राज्य आहे हे दाखवण्याचा भाजप सरकारचा प्रयत्न आहे, असा गंभीर आरोप त्यांनी केला.
राज्यातील लोकांची घरेच सुरक्षित नाहीत, असा टोलाही त्यांनी भाजप सरकारला लगावला. कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती पूर्णपणे कोलमडल्याने, काँग्रेस पक्ष देशाचे गृहमंत्री अमित शहा यांना यात लक्ष घालण्यासाठी आवाहन करत असल्याचे ते म्हणाले.