हणजूण जमीन हडप प्रकरण : मोहम्मद सुहैलसह चौघांविरोधात आरोपपत्र दाखल

एसआयटीची कारवाई

Story: ‍प्रतिनिधी। गोवन वार्ता |
2 hours ago
हणजूण जमीन हडप प्रकरण : मोहम्मद सुहैलसह चौघांविरोधात आरोपपत्र दाखल

पणजी: हणजूण येथील सर्व्हे क्रमांक ४८६/६ मधील जमीन हडप प्रकरणात गोवा पोलिसांच्या विशेष तपास पथकाने (एसआयटी) मोठी कारवाई केली आहे. एसआयटीने या प्रकरणातील मुख्य सूत्रधार मोहम्मद सुहैल उर्फ मायकल फर्नांडिस याच्यासह राजकुमार मैथी, राॅयसन्स राॅड्रिग्ज आणि डेन्वर डिसोझा यांच्याविरोधात म्हापसा प्रथमवर्ग न्यायालयात ५६९ पानांचे सविस्तर आरोपपत्र दाखल केले आहे. न्यायालयाने या आरोपपत्राची दखल घेतली असून, पुढील सुनावणी २४ नोव्हेंबर रोजी ठेवली आहे. दरम्यान, एसआयटीने मागील पंधरा दिवसांत वरील संशयिताविरोधात आणखी तीन आरोपपत्र दाखल केले आहे.

या प्रकरणी विल्मा डिसोझा यांनी तक्रार दाखल केली होती. त्यानुसार, तिच्या पूर्वजांची हणजूण येथील सर्व्हे क्र. ४८६/६ येथील १,८७५ चौ.मी. जमीन आहे. ही जमीन संशयित ब्रांका दिनिज, पावलिना दिनिज, मारियानो गोन्साल्विस आणि राॅयसन रॉड्रिग्ज, मोहम्मद सुहैल उर्फ मायकल फर्नांडिस, राजकुमार मैथी, डॅनवर डिसोझा आणि इतरांनी हडप केल्याचे म्हटले होते. याची दखल घेऊन तत्कालीन एसआयटीचे निरीक्षक सूरज सामंत यांनी वरील संशयिताविरोधात गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर त्यांची बदली झाल्यानंतर वरील प्रकरण एसआयटीचे उपनिरीक्षक योगेश गडकर यांच्याकडे वर्ग करण्यात आले. त्यांनी या प्रकरणी ७ आॅगस्ट २०२५ रोजी राॅयसन रॉड्रिग्जला अटक केली. त्यानंतर एसआयटीने मुख्य सूत्रधार मोहम्मद सुहैल उर्फ मायकल फर्नांडिस याला अटक करून कारवाई केली.

दरम्यान एसआयटीने तपासपूर्ण करून मुख्य सूत्रधार मोहम्मद सुहैल उर्फ मायकल फर्नांडिस याच्यासह राजकुमार मैथी, राॅयसन्स राॅड्रिग्ज आणि डेन्वर डिसोझा यांच्याविरोधात म्हापसा प्रथमवर्ग न्यायालयात ५६९ पानी आरोपपत्र दाखल केले आहेत.

१५ दिवसांत चार आरोपपत्रे दाखल

एसआयटीने मागील पंधरा दिवसांत मुख्य सूत्रधार मोहम्मद सुहैल उर्फ मायकल फर्नांडिस यांच्यासह राजकुमार मैथी, राॅयसन्स राॅड्रिग्ज आणि डेन्वर डिसोझा यांच्यासह इतरांविरोधात चार जमीन हडप प्रकरणांत आरोपपत्र दाखल केले आहे. त्यात हणजूण येथील सर्व्हे क्र. ४२६/१५ मधील ८,७५० चौमी. जमीन, पर्रा-बार्देश येथे सर्व्हे क्र. ३७/३ मधील १,८५० चौमी. आणि ३७/६ मधील ३,२५० चौमी. जमीन, आसगाव येथील सर्व्हे क्र. ३७/४ मधील २,२५० चौमी. जमीन आणि वरील हणजूण येथील सर्व्हे क्रमांक ४८६/६ येथील १,८७५ चौमी. जमिनीचा समावेश आहे.

एसआयटीने केलेली कारवाई

एसआयटीकडे सद्यःस्थितीत २८ जमीन हडप प्रकरणे आहेत. त्यापैकी १७ प्रकरणांत न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. तीन प्रकरणांत अंतिम अहवाल सादर करण्यात आला असून

न्यायालयाने तीन गुन्हे रद्द केले आहेत. एसआयटीने आतापर्यंत एकूण ८३ जणांना अटक केली आहे, त्यापैकी ११ जण वेगवेगळ्या प्रकरणांत सहभागी आहेत.

आरोपपत्रातून वगळलेले आरोपी आणि फरारी

- संशयित ब्रांका दिनिज आणि मारियानो गोन्साल्विस यांचे निधन झाल्यामुळे, तसेच संशयित पावलिना दिनिज यांचा सहभाग नसल्यामुळे, या तिघांना आरोपपत्रातून वगळण्यात आले आहे.

- संशयित राजकुमार मैथी आणि डेन्वर डिसोझा हे अजूनही फरार असून, एसआयटीने त्यांच्याविरोधात लुकआउट नोटीस जारी केली आहे.

हेही वाचा