५४ वर्षांनी पाकिस्तानी युद्धनौका बांगलादेशात

Story: विश्वरंग - बांगलादेश |
11 hours ago
५४ वर्षांनी पाकिस्तानी युद्धनौका बांगलादेशात

१९७१ च्या रक्तरंजित स्वातंत्र्य युद्धानंतर तब्बल ५४ वर्षांनी, प्रथमच पाकिस्तानी नौदलाची युद्धनौका 'पीएनएस सैफ' बांगलादेशच्या सदिच्छा भेटीवर दाखल झाली आहे. चार दिवसांच्या या भेटीसाठी हे जहाज चटगाव बंदरात पोहोचले असून, बांगलादेश नौदलाच्या 'बीएनएस शादिनोटा' या जहाजाद्वारे तिचे स्वागत करण्यात आले. कॅप्टन शुजात अब्बास राजा यांच्या नेतृत्वाखालील या भेटीचा अधिकृत उद्देश दोन्ही देशांमधील संरक्षण संबंध अधिक दृढ करणे हा असला, तरी या घटनेने दक्षिण आशियातील बदलत्या राजकीय समीकरणांचे स्पष्ट संकेत दिले आहेत.

बांगलादेशातील या घडामोडीमागे मोठी राजकीय पार्श्वभूमी आहे. ऑगस्ट २०२४ मध्ये शेख हसीना यांचे सरकार पडल्यानंतर आणि मुहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखालील अंतरिम सरकारने सूत्रे हाती घेतल्यानंतर, पाकिस्तानने या सत्तांतराचे स्वागत केले होते. तेव्हापासून पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यातील संबंध वेगाने सुधारत आहेत, तर दुसरीकडे भारतासोबतचे बांगलादेशचे संबंध कमालीचे तणावपूर्ण बनले आहेत.


याच सुधारलेल्या संबंधांचा भाग म्हणून, 'पीएनएस सैफ'च्या आगमनापूर्वी पाकिस्तानचे नौदल प्रमुख ॲडमिरल नवीद अश्रफ आणि सर्वोच्च लष्करी कमांडर जनरल साहिर शमशाद मिर्झा यांनीही बांगलादेशचा दौरा केला होता. इतकेच नव्हे तर, ऑगस्ट महिन्यात दोन्ही देशांमध्ये व्यापार, अर्थव्यवस्था, शिक्षण आणि संस्कृती यासह सहा महत्त्वपूर्ण करारांवर स्वाक्षऱ्या झाल्या. यामध्ये राजनैतिक पासपोर्टधारकांना व्हिसाशिवाय प्रवासाची परवानगी देणारा करारही समाविष्ट आहे.

पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यातील ही वाढती जवळीक भारतासाठी मात्र चिंतेचा विषय ठरली आहे. १९७१ च्या ज्या युद्धात पाकिस्तानी सैन्याने 'ऑपरेशन सर्चलाइट' अंतर्गत ३० लाख लोकांची निर्घृण हत्या केली होती आणि अमानुष अत्याचार केले होते, त्या कटू इतिहासाच्या पार्श्वभूमीवर, आता त्याच पाकिस्तानी युद्धनौकेचे बांगलादेशात स्वागत होणे, हे भारतासाठी धोक्याची घंटा मानले जात आहे.

भारताच्या चिंतेचे मुख्य कारण म्हणजे यातील चीनचा कोन. चटगाव बंदर भारताच्या पूर्व किनाऱ्याजवळ आहे. 'पीएनएस सैफ' ही युद्धनौका चीनने २०१० मध्ये पाकिस्तानला विकली होती. या चिनी-निर्मित जहाजांच्या हालचालींमुळे चीनला बांगलादेशात लष्करी प्रवेश मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यामुळे भारताच्या सागरी सुरक्षेला थेट धोका पोहोचू शकतो, अशी भीती तज्ज्ञांकडून व्यक्त होत आहे.

- ऋषभ एकावडे