अस्नोडा अपघातातील दीपेश मांद्रेकर मृत्यू प्रकरण

म्हापसा : गणेशनगर, अस्नोडा येथे तिलारी धरणाच्या कालव्यात कार कोसळून दीपेश दिलीप मांद्रेकर (४१, रा. कैलासनगर, अस्नोडा) या युवकाचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. या युवकाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याच्या आरोपाखाली कार चालक रितेश रोहिदास शिरगावकर (३५, रा. शिरगाव) याच्याविरुद्ध कोलवाळ पोलिसांनी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवला आहे. दरम्यान, रितेश हा इस्पितळात उपचार घेत असून त्याला डिस्चार्ज मिळाल्यानंतर पोलिसांकडून अटक होण्याची शक्यता आहे.
पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या १०५ कलमान्वये हा सदोष मनुष्यवधाचा गुन्हा रितेश शिरगावकर याच्याविरुद्ध दाखल केला आहे. सोमवारी दीपेश मांद्रेकर याचा मृतदेह शवविच्छेदनानंतर कुटुंबियांच्या स्वाधीन करण्यात आला. अस्नोडा स्मशानभूमीत शोकाकुल वातावरणात पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
दरम्यान, ही दुर्घटना रविवारी सायं. ७.३० च्या सुमारास घडली होती. दीपेश व रितेश हे दोघेही कारगाडीने कैलासनगर ते अस्नोडा पेट्रोल पंपच्या दिशेने तिलारीच्या कालव्यावरून जात होते. गणेशनगर येथील टेकडीवर पोहोचताच संशयित चालक रितेश शिरगावकर याचे कारवरील नियंत्रण सुटले व गाडी थेट कालव्यात कोसळली. त्यानंतर गाडी वाहून काही अंतरावर जाऊन अडकली.
कारमधून बाहेर पडल्यानंतर रितेश शिरगावकर याने लोकवस्तीत धाव घेत आरडाओरड करीत घटनेची माहिती लोकांना दिली. स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच डिचोली अग्निशमनला माहिती मिळताच त्यांनी दीपेशला बाहेर काढले. मात्र, तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता. पुढील तपास निरीक्षक संजित कांदोळकर यांच्या मार्गदर्शनाखाली कोलवाळ पोलीस करीत आहेत.
सीट बेल्टमुळे झाला मृत्यू
अपघात घडताच संशयित रितेश शिरगावकर हा कसाबसा कारमधून बाहेर पडला आणि त्याने स्वतःचा जीव वाचवला. मात्र, दीपेश मांद्रेकर याने सीट बेल्ट लावलेला असल्याने त्याला तो वेळेत काढता आला नाही. तसेच, गाडी डाव्या बाजूने कालव्यात कोसळल्यामुळे त्याला स्वतःचा बचाव करता आला नाही आणि त्यातच त्याचा बुडून मृत्यू झाला.