१४ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार करून गरोदर केल्याप्रकरणी बाप दोषी

बाल न्यायालयाचा आदेश : १९ नोव्हेंबर रोजी सुनावणार शिक्षा

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
10th November, 11:35 pm
१४ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार करून गरोदर केल्याप्रकरणी बाप दोषी

पणजी : वैद्यकीय अहवाल सकारात्मक आल्याचे निरीक्षण नोंदवून सासष्टी तालुक्यात २०१८ मध्ये स्वतःच्या १४ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिला गरोदर केल्याप्रकरणी बाल न्यायालयाने वडिलांला दोषी ठरविले आहे. बाल न्यायालय अध्यक्ष सई प्रभुदेसाई यांनी आदेश दिला आहे.
या प्रकरणी मडगाव पोलिसांनी २७ डिसेंबर २०१८ रोजी गुन्हा दाखल केला आहे. त्यानुसार, सासष्टी तालुक्यातील १४ वर्षीय मुलीची तब्येत ठीक नसल्यामुळे तिला नातेवाईकांनी डिसेंबर २०१८ मध्ये दवाखान्यात नेले होते. तिथे तिची चाचणी केली असता, ती गरोदर असल्याचे समोर आले. डॉक्टरांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली. त्यानुसार, पीडित मुलीच्या नातेवाईकांनी तक्रार दाखल केली होती. या प्रकरणी मुलीचा जबाब बिगर सरकारी संस्थेमार्फत घेण्यात आला. त्यात तिच्या वडिलाने एप्रिल ते डिसेंबर २०१८ मध्ये लैंगिक अत्याचार केल्याचे समोर आले. त्यानुसार, मडगावचे तत्कालीन महिला उपनिरीक्षक प्रज्ञा जोशी यांनी गुन्हा दाखल करून संशयिताला अटक केली. या प्रकरणी पोलिसांनी तपासपूर्ण करून २४ जानेवारी २०१९ रोजी बाल न्यायालयात आरोपपत्र दाखल केले.
दरम्यान, न्यायालयाने दोन्ही पक्षांची बाजू एेकून घेतल्यानंतर बाल न्यायालय अध्यक्ष सई प्रभुदेसाई यांनी पीडित मुलीच्या बापाला दोषी ठरविले. आरोपीच्या शिक्षेवर १९ नोव्हेंबर रोजी सुनावणी होणार आहे.

डीएनए आणि साक्ष ठरली महत्त्वाची
न्यायालयात सरकारी अभियोक्ता मिलेना पिंटो आणि थेमा नार्वेकर यांनी आरोपी विरोधातील पुरावे सिद्ध केले. त्यांनी डीएनए अहवाल सकारात्मक आल्याचा युक्तिवाद करून आरोपी विरोधात वैद्यकीय तसेच इतर पुरावे सादर केले. न्यायालयात पीडित मुलीची आणि साक्षीदारांची उलटतपासणी केली असता, त्यांनी वडिलांविरोधात दिलेली साक्ष महत्त्वाची ठरली.

हेही वाचा