म्हापशात महामार्गावर अपघात; दोघे कारचालक जखमी

दोन्ही जखमींना म्हापसा जिल्हा इस्पितळात दाखल

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
10th November, 11:36 pm
म्हापशात महामार्गावर अपघात; दोघे कारचालक जखमी

गावसावाडा, म्हापसा येथे अपघातात सापडलेली कारगाडी.‍‍

म्हापसा : गावसावाडा, म्हापसा येथे तार उड्डाण पुलाजवळ दोन कारगाडीमध्ये झालेल्या अपघातात दोघे कार चालक जखमी झाले. जखमींमध्ये पूजा वाडकर (रा. पणजी) व प्रितेश नाईक (रा. साळ डिचोली) यांचा समावेश आहे.
हा अपघात सोमवारी सायं. ५.३० च्या सुमारास घडला. पूजा वाडकर या जीए ०७ के ९१६४ या कारने करासवाडाहून पणजीच्या दिशेने जात होत्या. तर प्रितेश नाईक हे जीए ०४ ई ८०१७ या कारने विरुद्ध दिशेने जात होते. महामार्गावरील तार उड्डाण पुलापासून काही अंतरावर वाडकर यांचे गाडीवरील नियंत्रण सुटले व दुभाजकाला धडक देत गाडीने विरुद्ध दिशेने येणाऱ्या नाईक यांच्या गाडीला ठोकर दिली. त्यानंतर सर्व्हिस रोडच्या दुभाजकावर ही कार कलंडली. तर नाईक यांची कार रस्त्यावर आडवी झाली.
कलंडलेली कारगाडी धक्का देऊन उभी करीत आतमध्ये अडकलेल्या वाडकर यांना जमावाने बाहेर काढले. त्यानंतर दोन्ही जखमींना म्हापसा जिल्हा इस्पितळात दाखल केले. तिथे दोघाही जखमींवर उपचार करण्यात आले. या अपघातात दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. अपघाताचा पंचनामा म्हापसा पोलीस हवालदार विजय गडेकर यांनी केला. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

हेही वाचा