अनेकांच्या पदरी निराशा : उत्तर गोव्यात १५, दक्षिण गोव्यात १७ मतदारसंघ राखीव

प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : गोव्यात १३ डिसेंबर रोजी होणाऱ्या जिल्हा पंचायत निवडणुकीसाठीच्या आरक्षणाची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. पारंपकरिक मतदारसंघ आरक्षित झाल्यामुळे विद्यमान ८० टक्के सदस्यांचे पुन्हा निवडणूक लढविण्याचे स्वप्न भंगले आहे. उत्तर गोव्यातील २५ पैकी १५, तर दक्षिण गोव्यातील २५ पैकी १७ मतदारसंघ महिला, एससी, एसटी वा ओबीसींसाठी राखीव ठेवण्यात आले आहेत. यामुळे एकूण ५० मतदारसंघांपैकी एकूण ३२ मतदारसंघ राखीव झाले आहेत.
उत्तर गोवा जिल्हा पंचायतीचे अध्यक्ष धाकू मडकईकर, माजी जिल्हा पंचायतीचे अध्यक्ष शंकर चोडणकर यांचे पारंपरिक मतदारसंघ महिलांसाठी राखीव झाले असल्याने त्यांना त्यांच्या पारंपरिक मतदारसंघातून निवडणूक लढविता येणार नाही. याशिवाय खुशाली वेळीप यांच्यासह इतर अनेक जणांना आरक्षणाचा फटका बसला आहे.
राजकीय वातावरण तापणार
जिल्हा पंचायत निवडणूक पक्षीय पातळीवर होणार असल्याने उमेदवारीसाठी मनधरणी व दबावतंत्राचा वापर आहे. मंत्री, आमदारांचे समर्थक गुडघ्याला बाशिंग बांधून तयार आहेत. एकाच ठिकाणी तीन-चार जण इच्छुक असल्याने बंडखोरीचा फटका भाजपला बसण्याची शक्यता आहे. आरक्षणामुळे अनेकांचा अपेक्षाभंग झाला असला तरी काही जणांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. 
प्रत्येक मतदारसंघात अनेक कार्यकर्ते निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक आहेत. इच्छुकांची संख्या अधिक असली तरी पक्षाला बंडखोरीचा फटका बसणार नाही. सर्वांशी चर्चा करून उमेदवार निश्चित केले जातील.
_ दामू नाईक, प्रदेशाध्यक्ष, भाजप
सविस्तर कार्यक्रमाची घोषणा लवकरच
आरक्षणाची अधिसूचना जारी झाली असली तरी आचारसंहिता व निवडणूक प्रक्रियेची अधिसूचना जारी झालेली नाही. १३ डिसेंबर रोजी निवडणूक असल्याने १३ नोव्हेंबरपासून आचारसंहिता लागू होईल. उमेदवारी अर्ज भरण्याबरोबर छाननी, अर्ज मागे घेणे व मतमोजणीची तारीख पुढील आठवड्यात जाहीर होणार आहे.
राज्यातील आरक्षण
महिला : १२
महिला ओबीसी : ५
ओबीसी : ८
एससी : १
एसटी : ५
महिला एसटी : १
सर्वसामान्य : १८
उत्तर गोव्यातील आरक्षण
महिला : हरमल, मोरजी (ओबीसी), कोलवाळ, कळंगूट, रेईश मागूश, सांताक्रूझ (ओबीसी), चिंबल, सेंट लॉरेन्स (ओबीसी), मये.
एससी : एकही नाही.
एसटी : ताळगाव
ओबीसी : मोरजी (महिला), तोर्से, हणजूण, सांताक्रूझ (महिला), सेंट लॉरेन्स (महिला), पाळी, होंडा
दक्षिण गोव्यातील आरक्षण
महिला : उसगाव-गांजे, वेलिंग-प्रियोळ, बोरी, शिरोडा, नावेली (ओबीसी), रिवण (एसटी), बार्से, खोला (ओबीसी), कुठ्ठाळी.
एससी : केरी
एसटी : कुर्टी, राय, गिर्दोली, सावर्डे, रिवण (महिलांसाठी)
ओबीसी : कवळे, नुवे, दवर्ली, कुडतरी, नावेली (महिला), खोला (महिला)
सर्वसामान्यांसाठीचे मतदारसंघ
उत्तर गोवा : धारगळ, शिवोली, हळदोणा, शिरसई, सुकूर, पेन्ह द फ्रान्स, खोर्ली, लाटंबार्से, कारापूर - सर्वण, नगरगाव.
दक्षिण गोवा : बेतकी-खांडोळा, कोलवा, वेळ्ळी, बाणावली, धारबांदोडा, शेल्डे, पैंगीण, सांकवाळ.
धाकू मडकईकरांसह अनेकांचे मतदारसंघ राखीव
पणजी : आरक्षणानंंतर उत्तर गोवा जिल्हा पंंचायतीचे अध्यक्ष धाकू मडकईकर यांच्यासह अनेक विद्यमान सदस्यांंचे मतदारसंंघ राखीव बनल्याने निवडणुकीनंंतर मोठ्या संख्येने नवे सदस्य असतील. उत्तर गोव्याचे माजी जिल्हा पंचायत अध्यक्ष शंकर चोडणकर यांचा मये मतदारसंघ महिलांसाठी राखीव झाल्याने त्यांचाही पत्ता कट झाला आहे.
उत्तर गोवा जिल्हा पंचायतीचे अध्यक्ष धाकू मडकईकर यांंचा सेंट लॉरेन्स मतदारसंंघ महिला ओबीसीसाठी राखीव ठेवण्यात आला आहे. सदस्या देवयानी गावस यांंचा केरी मतदारसंंघ अनुसूचित जातीसाठी (एससी) राखीव ठेवला आहे. यामुळे त्या आता केरीतून निवडणूक लढवू शकणार नाहीत. मुख्यमंंत्री डॉ. प्रमोद सावंंत यांंचे खंंदे समर्थक गोपाळ सुर्लकर यांंचा पाळी मतदारसंंघ ओबीसीसाठी राखीव झाला आहे. खोर्ली मतदारसंघ सर्वसामान्यांसाठी असल्याने केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांचे सुपुत्र सिद्धेश नाईक पुन्हा जिल्हा पंचायत सदस्य बनण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
दक्षिण गोव्याचा विचार करता दक्षिण गोवा जिल्हा पंचायतीचे अध्यक्ष संजना वेळीप यांचा गिर्दोळी मतदारसंघ महिला एसटीसाठी आरक्षित असल्याने त्यांना गिर्दोळीतून निवडणूक लढविता येणार नाही.