म्हापसा येथे २०२० साली झाला होता खून

प्रतिनिधी। गोवन वार्ता
म्हापसा : राहुल बंगाली या हमालाच्या खून प्रकरणातील प्रत्यक्षदर्शी साक्षीदाराच्या उलटतपासणीत त्रुटी सापडल्या, जप्त करण्यात आलेल्या दंडुक्यावर रक्ताचे डाग नव्हते, तसेच जप्त करण्यात आलेल्या संशयिताच्या कपड्यासंदर्भात त्रुटी असल्याचे निरीक्षण नोंदवून वरील खून प्रकरणात कनिष्ठ न्यायालयाने पितांबर मलिक याला दिलेली जन्मठेपेची शिक्षा गोवास्थित मुंबई उच्च न्यायालयाने रद्द केली. मलिक याची निर्दोष सुटका करण्यात आली. याबाबतचा आदेश न्या. सारंग कोतवाल आणि न्या. आशिष चव्हाण यांच्या द्विसदस्यीय न्यायपीठाने दिला.
म्हापसा पोलिसांनी ऑक्टोबर २०२० मध्ये गुन्हा दाखल केला होता. त्यानुसार, तळीवाड-म्हापसा येथे राहुल बंगाली या हमालचा १४ ऑक्टोबर २०२० रोजी म्हापसा येथील केणी टॉवर इमारतीच्या पदपथावर खून करण्यात आला होता. या प्रकरणी पोलिसांनी त्याचा साथीदार पितांबर मलिक या हमालाला अटक केली होती. मलिक आणि बंगाली यांच्यात मैत्रिणीवरून पूर्ववैमनस्य होते. दोघेही म्हापसा बाजारपेठेत हमाल म्हणून काम करत होते. बाजारपेठेतच पदपथावर त्यांचे वास्तव्य होते.
घटनेच्या दिवशी दुपारी बंगाली मैत्रिण महिलेसोबत केणी टॉवर इमारतीच्या खाली पदपथावर जेवण करायला बसले होते. त्यावेळी संशयित पितांबरने वाद उकरून काढला. पितांबरने दडुंक्याने बंगालीच्या डोक्यावर वार केला. त्यात राहुल बंगाली याचा मृत्यू झाला होता. म्हापसा पोलिसांनी घटनास्थळाजवळील दुकानदारांकडे चौकशी केली. दुकानांतील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करून संशयित पितांबर मलिक याला खून प्रकरणी अटक केली. पोलिसांनी उत्तर गोवा जिल्हा व सत्र न्यायालयात आरोपपत्र दाखल केले. पणजी अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने सुनावणी घेऊन पितांबरी मलीक याला १६ आॅगस्ट २०२३ रोजी जन्मठेपेची शिक्षा ठोठावली.
पितांबर मलिक याने वरील शिक्षेला गोवास्थित मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले. या प्रकरणी संशयित पितांबर मलिक याच्यातर्फे अॅड. सागर धारगळकर यांनी न्यायालयात युक्तिवाद केला. न्यायालयाने दोन्ही बाजू एेकून घेतल्यानंतर वरील निरीक्षण नोंदवून पितांबर मलिकची जन्मठेपेची शिक्षा रद्द करून निर्दोष सुटका केली.
उच्च न्यायालयात संशयिताच्या वकिलाने केलेला युक्तिवाद
घटनास्थळ परिसरातील दुकानात काम करणाऱ्या दोन्ही प्रत्यक्षदर्शी साक्षीदाऱ्यांच्या उलटतपासणीतील त्रुटी आहेत.
जप्त करण्यात आलेल्या दंडुक्यावर रक्ताचे डाग नाहीत.
पोलिसांनी संशयिताला दुपारी २.३० वाजता अटक केली. त्यानंतर ५.३० वाजता त्याचे कपडे जप्त केले. मात्र दुपारी २.३० ते सायं. ५.३० या कालावधीत संशयिताला कुठे ठेवले होते, याचे स्पष्टीकरण दिलेले नाही.
संशयित पितांबर मलिक याची निर्दोष सुटका करावी.