दिल्लीसह अन्य राज्यांतही झाडाझडती

प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : सक्तवसुली संचालनालयाच्या दिल्ली विभागाकडून गोव्यातील कॅसिनो आणि रिअल इस्टेटशी निगडित कंपनीच्या मालकांवर बांबोळी, दोनापावलासह दिल्ली आणि इतर राज्यांत छापे टाकण्यात आले. शुक्रवारी पहाटे पासून सुरू केलेले छापे रात्री उशिरापर्यंत सुरू होते. ‘फेमा’ कायद्याअंतर्गत करण्यात आलेल्या या कारवाईने कंपनीशी निगडित कॅसिनो आणि रिअल इस्टेट उद्योग क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी पहाटे ईडीच्या दिल्ली विभागाच्या अधिकाऱ्यांनी प्रथम कॅसिनो आणि रिअल इस्टेटशी निगडित कंपनीच्या मालकावर दोनापावला येथील बंगल्यावर छापा टाकला. या कारवाईदरम्यान अधिकाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात दस्तऐवज आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणे जप्त केली. त्यानंतर बांबोळी येथील बंगल्यावरची कारवाई सुरू करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान संबंधित कंपनीच्या इतर मालकांच्या दिल्ली व इतर राज्यांतील ठिकाणांवरही ईडीच्या दिल्ली विभागाकडून एकाच वेळी छापे टाकण्यात आले. संबंधित कंपनीच्या मालकाच्या दिल्ली आणि इतर ठिकाणी एकाच वेळी छापासत्र सुरू केल्यामुळे कंपनीशी निगडित कॅसिनो तसेच रिअल इस्टेट उद्योग क्षेत्रात खळबळ उडाली आहे. ईडीने ही कारवाई ‘फेमा’ कायद्याअंतर्गत कारवाई सुरू केल्याची माहिती सूत्रांनी दिली. ही कारवाई शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत सुरू होती. काही ठिकाणी पूर्ण झालेल्या कारवाईत ईडीने मोठ्या प्रमाणात विदेशी चलनांसह दस्तऐवज आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणे जप्त केल्याची माहिती समोर येत आहेत.