मंत्री, आमदार असतानाच ‘या’ नेत्यांची संपली जीवनयात्रा


15th October, 11:57 pm
मंत्री, आमदार असतानाच ‘या’ नेत्यांची संपली जीवनयात्रा

प्रतिनिधी। गोवन वार्ता

पणजी : गोव्याचे पहिले मुख्यमंत्री भाऊसाहेब बांदोडकर, माथानी साल्ढाणा, फ्रान्सिस डिसोझा, माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्यानंतर आता ‘पात्रांव’ म्हणून ओळखले जाणारे रवी नाईक यांचे मंत्रिपदावर असतानाच निधन झाले.


गोव्याचे पहिले मुख्यमंत्री भाऊसाहेब बांदोडकर यांचे १२ ऑगस्ट १९७३ रोजी निधन झाले. मुख्यमंत्री असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनानंतर त्यांची कन्या स्व. शशिकला काकोडकर यांचा मुख्यमंत्री म्हणून शपथविधी झाला. यानंतर मनोहर पर्रीकर यांच्या सरकारात मंत्री असतानाच माथानी साल्ढाणा यांचे २१ मार्च २०१२ रोजी आकस्मिक निधन झाले. त्यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी एलिना साल्ढाणा कुठ्ठाळी मतदारसंघातून भाजपतर्फे आमदार झाल्या.


म्हापसा मतदारसंघातून १९९९पासून सलग निवडून आलेले फ्रान्सिस डिसोझा यांचे १४ फेब्रुवारी २०१९ रोजी निधन झाले. अमेरिकेत उपचार सुरू असतानाच त्यांना मंत्रिपदाच्या जबाबदारीतून मुक्त करण्यात आले होते. यानंतर अवघ्याच दिवसांनी त्यांचे आमदार असतानाच निधन झाले.


कर्करोगामुळे वर्षाहून अधिक काळ आजारी असलेल्या मनोहर पर्रीकर यांचे मुख्यमंत्री असतानाच १७ मार्च २०१९ रोजी निधन झाले. आत मंगळवारी रात्री कृषीमंत्री रवी नाईक यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. फ्रान्सिस डिसोझा, मनोहर पर्रीकर यांच्याप्रमाणे रवी नाईकसुद्धा आजारी होते. त्यांच्यावर उपचार सुरू होते. निय‌मित आरोग्य तपासणीसाठी ते बंगळुरूला जाणार होते. त्यासाठी त्यांनी तिकीटही काढून ठेवले होते. मात्र त्यापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली.