पोलिसांसमोर दिली कबुली; म्हणाला-'मला कंटाळा आला म्हणून..'

नाशिक: आई आणि मुलाच्या पवित्र नात्याला काळिमा फासणारी आणि संपूर्ण नाशिकला हादरवणारी एक संतापजनक घटना समोर आली आहे. पोटच्या मुलाने आपल्या वृद्ध आईची अत्यंत निर्घृणपणे हत्या केली. एवढेच नाही, तर हत्या केल्यानंतर त्याने स्वतः पोलिसांसमोर हजर होऊन हा गुन्हा केल्याची कबुली दिली.
'कंटाळा आला, म्हणून खून केला'
नाशिकमधील शिवाजीनगर परिसरात ही संतापजनक घटना घडली आहे. अरविंद मुरलीधर पाटील या नराधम मुलाने ८० वर्षीय आई यशोदाबाई पाटील यांचा जीव घेतला. हत्येनंतर आरोपी अरविंद याने थेट पोलीस स्थानकात संपर्क साधला आणि पोलिसांसमोर हत्येचे जे कारण सांगितलं, ते ऐकून पोलिसांनाही धक्का बसला. "मला कंटाळा आला होता, म्हणून मी माझ्या आईचा गळा दाबून खून केला. मला अटक करा," असे आरोपी मुलानं पोलिसांना सांगितले.
पोलिसांनी केली तपासणी
आरोपीनं गुन्हा कबूल केल्यानंतर, नाशिक रोड पोलिसांनी तातडीने अरविंद पाटील याच्या घराची झडती घेतली. तपासादरम्यान, पोलिसांना वृद्ध यशोदाबाई यांचा मृतदेह घरात आढळून आला. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला आणि आरोपी अरविंद पाटील याच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.
मानसिक रुग्ण असल्याचा संशय
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी अरविंद पाटील हा मानसिक रुग्ण असल्याची माहिती आहे. त्याच्या या बिघडलेल्या मानसिक स्थितीमुळे त्याची पत्नी त्याला सोडून गेली होती. आईवरच हात उचलून तिची निर्घृण हत्या करण्याच्या या हादरवणाऱ्या घटनेनंतर संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. मुलगाच आईचा काळ बनल्याच्या या घटनेवर नागरिकांकडून तीव्र संताप व्यक्त होत आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.