लोह उत्पादन कंपनी, कोलवा येथील बंगल्यावर छापा

पणजी : आयकर खात्याच्या गोवा विभागाने बुधवारी पहाटेपासून सांतोन-सावर्डे येथील एका लोह उत्पादन कंपनीवर तसेच कंपनीच्या मालकाच्या कोलवा येथील बंगल्यावर छापा टाकला. करचुकवेगिरीच्या संशयावरून करण्यात आलेल्या या कारवाईने उद्योग क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
माहितीनुसार, बुधवारी पहाटे आयकर अधिकाऱ्यांनी प्रथम कोलवा येथील बंगल्यावर छापा टाकला. या कारवाईदरम्यान अधिकाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात दस्तावेज, लेखा नोंदी आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणे जप्त केली आहेत. बंगल्यावरची कारवाई पूर्ण झाली आहे. यानंतर सांतोन-सावर्डे येथील लोह उत्पादन कंपनीवर आयकर विभागाने छापासत्र सुरू केले. या फॅक्टरीवरील
तपास अद्याप सुरू असल्याची माहिती मिळत आहे.
दरम्यान, या कंपनीशी संबंधित इतर मालकांच्या दिल्ली, हैदराबाद तसेच इतर राज्यांतील ठिकाणांवरही आयकर विभागाकडून एकाच वेळी छापे टाकण्यात आले असल्याचे समजते. आयकर विभागाकडून अधिकृत निवेदन अद्याप जाहीर झालेले नाही. मात्र, प्राथमिक माहितीनुसार ही कारवाई करचुकवेगिरी आणि उत्पन्न लपविण्याच्या प्रकरणाशी संबंधित असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. राज्यात मागील एक महिन्यात सक्तवसुली संचालनालयाकडून (ईडी) जमीन हडप तसेच इतर प्रकरणात मोठ्या प्रमाणात छापे टाकून १,५०० कोटी रुपयांची मालमत्ते संदर्भात दस्तावेज जप्त केले आहे.
याशिवाय बिग डॅडी कॅसिनोसह, दिल्ली, मुंबई, राजकोट व इतर मिळून १५ ठिकाणी छापा टाकून २.२५ कोटी रुपये, १४ हजार यूएस डाॅलर आणि ८.५ लाख रुपये किमतीचे विदेशी चलन जप्त केले आहे. तसेच इतर प्रकरणात मोठ्या प्रमाणात रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. ईडीनंतर आता आयकर खात्यात गोव्यात छापासत्र सुरू केला आहे. त्यामुळे गोव्यात मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर व्यवहार होत असल्याचे समोर आले आहे.
कंपनीच्या देशातील विविध ठिकाणी छापे
या कंपनीवर कारवाई करताना आयकर विभागाने मोठ्या प्रमाणात समन्वय साधत देशातील विविध ठिकाणी छापा टाकला आहे. समजते की, या कंपनीशी संबंधित इतर भागीदार आणि मालकांच्या दिल्ली, हैदराबाद तसेच इतर राज्यांतील काही व्यावसायिक ठिकाणांवरही आयकर अधिकाऱ्यांनी छापे घातले आहेत. या ठिकाणांहून मोठ्या प्रमाणात आर्थिक कागदपत्रे, बँक व्यवहारांची नोंद, संपत्तीशी संबंधित कागदपत्रे आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणे जप्त करण्यात आली असल्याचे प्राथमिक माहितीवरून समजते.