वेळ्ळीतील चिंचणी येथून प्रारंभ : दक्षिण गोव्यात काँग्रेसची सह्यांची मोहीम सुरू

सह्यांच्या मोहिमेचा शुभारंभ करताना काँग्रेसचे गोवा प्रभारी माणिकराव ठाकरे, प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर, खासदार विरियातो फर्नांडिस व इतर.
प्रतिनिधी। गोवन वार्ता
मडगाव : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मतांची चोरी कशी होते, ते लोकांसमोर मांडले आहे. निवडणूक आयोगावर टीका केल्यास भाजप समर्थनार्थ पुढे येते. राज्यातील लोकांच्या घरोघरी जाऊन याची माहिती दिली जाईल. प्रत्येक मतदारसंघातील सुमारे ५००० लोकांच्या सह्यांचे निवेदन निवडणूक आयोगाला सादर केले जाईल, अशी माहिती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी दिली.
काँग्रेसने मतचोरीविरोधात राज्यात सह्यांची मोहीम वेळ्ळी मतदारसंघातील चिंचणी येथून सुरू केली. यावेळी गोवा प्रभारी माणिकराव ठाकरे, प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर, खासदार विरियातो फर्नांडिस, दक्षिण गोवा जिल्हा काँग्रेस अध्यक्ष साविओ डिसिल्वा, जिल्हा पंचायत सदस्य ज्युलिओ फर्नांडिस, मिशेल रिबेलो व अॅडविन कार्दोज, ऑर्लिन दुरांदो, मरिनो रिबेलो, महेश नादार व इतर उपस्थित होते.
मतचोरीविरोधातील सह्यांची मोहीम घराघरापर्यंत नेली जाईल. संसदेत मतचोरीवर विशेष सत्राचे आयोजन करण्याची मागणी सभापतींनी फेटाळून लावली. यातून संसदेतही भाजप महत्त्वाच्या विषयावर चर्चा होऊ देत नसल्याचे दिसते. गोव्यातील मतदारांनी या मोहिमेत भाग घ्यावा, असे आवाहन खासदार विरियातो फर्नांडिस यांनी केले.
काँग्रेसच्या मागण्या
मतदारयादी फोटोसह सार्वजनिकरीत्या पाहणीसाठी उपलब्ध करावी.
प्रत्येक निवडणुकीआधी मतदारांची नावनोंदणी व नावे वगळली ती यादी फोटोसह सार्वजनिक असावी.
विशेष पुनपर्रीक्षण मोहिमेत नावे वगळण्यात आलेल्यांना मत मांडणीचा अधिकार असावा व त्यासाठी तक्रार कक्ष असावा.
शेवटच्या क्षणी नाव नोंद करणे व वगळणे बंद व्हावे.
मतचोरीतील प्रक्रियेत सहभागी अधिकार्यांवर कारवाई व्हावी
भाजप, रा.स्व. संघाचे काम संविधानविरोधी : ठाकरे
गोवा प्रभारी माणिकराव ठाकरे म्हणाले, राहुल गांधी यांनी कर्नाटकसह देशभरात मतचोरी होत असल्याचे दाखवून दिले आहे. भाजप व रा. स्व. संघ संविधानविरोधी काम करत आहेत. मतचोरी म्हणजे संविधानाने दिलेला हक्क गमावणे असाच आहे. याविरोधात काँग्रेसकडून घरोघरी जागृती केली जात आहे.