गोव्याची २००० मेट्रिक टन दारू परदेशात

Story: समीप नार्वेकर । गोवन वार्ता |
06th October, 04:20 pm
गोव्याची २००० मेट्रिक टन दारू परदेशात

पणजी: गोवा निर्मित दारुला जगभरात मोठी मागणी आहे. ही गोष्ट आता कृषी आणि प्रक्रियाकृत खाद्य उत्पादने निर्यात विकास प्राधिकरणाने जारी केलेल्या अकडेवारीमधूनही स्पष्ट झाले आहे. 'एपीडा'ने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, चालू आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये एप्रिल ते जुलै या चार महिन्यांदरम्यान गोव्यातून एकूण २८३९ मेट्रिक टन उत्पादनांची निर्यात झाली. यात सर्वात मोठा वाटा हा गोवा निर्मित दारूचा होता. 

कृषी आणि प्रक्रिया केलेल्या खाद्य उत्पादनांना आंतरराष्ट्रीय बाजारात (परदेशात) मोठी मागणी आहे. अधिक माहितीनुसार, चालू आर्थिक वर्षातील पहिल्या चार महिन्यांत गोव्यातून तब्बल २८३९ मेट्रिक टन उत्पादनांची निर्यात झाली आहे. या निर्यातीतून देशाला ५.९९ मिलियन अमेरिकन डॉलर म्हणजेच सुमारे ५० कोटी रुपयांचे मूल्य मिळाले. या निर्यातीत दारू पहिल्या क्रमांकावर आहे. सर्वाधिक २०४८ मेट्रिक टन दारूची निर्यात परदेशी देशांमध्ये झाली असून, यातून सुमारे २५.२१ कोटी रुपयांचे मोठे मूल्य प्राप्त झाले आहे. दुसऱ्या क्रमांकावर भाजीपाला आहे. ५८७ मेट्रिक टन भाजीपाला परदेशात निर्यात झाला असून, यातून सुमारे १४.४५ कोटी रुपये मिळाले आहेत.

काजू आणि आंब्यालाही चांगली मागणी

दारू आणि भाजीपाल्यासोबतच गोव्यातील काजू आणि आंब्यालाही विदेशात चांगली मागणी असल्याचे 'एपीडा'ने स्पष्ट केले आहे:

* १०२ मेट्रिक टन काजू बियांची निर्यात झाली असून, यातून सुमारे ८.६३ कोटी रुपये मूल्य प्राप्त झाले आहे.

* ४५ मेट्रिक टन आंब्याची निर्यात झाली असून, यातून सुमारे १.३८ कोटी रुपयांचे मूल्य मिळाले आहे.

या निर्यातीत दारू, काजू बिया, आंबे, औषधी वनस्पती आणि गोड पदार्थ (कन्फेक्शनरी) यांचा समावेश आहे. गोव्यातील उत्पादने आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत आपले स्थान मजबूत करत असल्याचे या आकडेवारीवरून अधोरेखित झाले आहे.