
मडगाव: मुंगूल येथील गँगवॉरप्रकरणाचा तपास फातोर्डा पोलिसांनी अधिक तीव्र केला आहे. यापूर्वी २५ संशयितांना अटक केल्यानंतर शुक्रवारी आणखी तिघा संशयितांनी पोलिसांसमोर शरणागती पत्करली आहे. या तीन संशयितांना ताब्यात घेण्यात आल्यामुळे या प्रकरणातील एकूण अटकेची संख्या २८ झाली आहे.
याप्रकरणी संशयित असलेले अमोघ नाईक, व्हॅली डीकोस्टा आणि प्रकाश करबार यांनी शुक्रवारी आपापल्या वकिलांसह दक्षिण गोवा जिल्हा मुख्यालयात येत पोलिस अधीक्षक टिकमसिंग वर्मा यांच्यासमोर समर्पण केले. फातोर्डा पोलिसांनी या तिन्ही संशयितांना पुढील चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.
घातक शस्त्रांचा वापर
मुंगूल-माडेल येथील शगुन हॉटेलनजीक १२ ऑगस्ट रोजी ही गँगवॉरची घटना घडली होती. या दिवशी संशयितांनी गाडी अडवून तलवार, कोयता आणि सोडा बॉटल्सचा वापर करत गोळीबारही केला होता. या घटनेत 'वॉल्टर गँग'चे रफीक ताशान (२४) व युवकेश सिंग बदैला (२०) हे गंभीर जखमी झाले होते.
या गँगवॉरमध्ये सहभागी असलेल्या २५ संशयितांना दक्षिण गोवा पोलिस अधीक्षक वर्मा यांच्या नेतृत्वाखालील पथकांनी यापूर्वीच अटक केली आहे. तसेच, बिश्नोई गँगशी संबंध असलेला आणि बंदूक पुरवल्याचा संशय असलेला ओमसा याला पथकाने राजस्थानमध्ये जाऊन अटक केली होती. शरणागती पत्करलेले संशयित अमोघ नाईक आणि इतरांनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केले होते, त्यावर ४ ऑक्टोबर रोजी सुनावणी होणार आहे.