भारत-विंडीज पहिली कसोटी आजपासून

दोन सामन्यांची मालिका : पहिले दोन ​दिवस मुसळधार पावसाची शक्यता

Story: न्यूज डेस्क । गोवन वार्ता |
02nd October, 12:09 am
भारत-विंडीज पहिली कसोटी आजपासून

अहमदाबाद : आशिया चषक २०२५ स्पर्धेत अलीकडेच भारताने ट्वेन्टी-२० फॉर्मेटमध्ये विजय मिळवला आहे. त्यानंतर गुरुवारपासून शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ मायदेशातील क्रिकेट हंगामाला सुरुवात करणार आहे. भारतीय संघाची दोन सामन्यांची कसोटी मालिका वेस्ट इंडिज संघाविरुद्ध अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळली जाणार असून, यजमान संघाच्या वरचष्म्याची अपेक्षा आहे. दरम्यान सामन्याचे पहिले तीन दिवस वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. अखेरचे दोन दिवस ढगाळ वातावरण राहण्याची अपेक्षा आहे.
अहमदाबादची खेळपट्टी सामान्यत: फिरकी गोलंदाजांना अनुकूल मानली जाते, पण पहिल्या कसोटीसाठी खास ‘हिरवीगार’ खेळपट्टी तयार करण्यात आली आहे. अशा परिस्थितीत वेगवान गोलंदाजांची कामगिरी निर्णायक ठरण्याची शक्यता आहे.
भारताने रविवारी दुबई येथे आशिया चषक २०२५ मध्ये विजेतेपद पटकावले. त्यानंतर कर्णधार शुभमन गिल आणि प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी सोमवार व मंगळवारी अहमदाबाद गाठली. भारतीय खेळाडूंनी गेले दोन दिवस कसून सराव केला. गिलच्या नेतृत्वाखाली ही त्याची पहिली मायदेशातील कसोटी मालिका आहे. त्यामुळे यशस्वी सुरुवात करण्याचा त्याचा मानस आहे. ही मालिका जागतिक कसोटी अजिंक्यपद (डब्ल्यूटीसी) स्पर्धेचा भाग असल्यामुळे भारताला दोन्ही सामने जिंकून अधिकाधिक गुण मिळवणे आवश्यक आहे.
गिलने इंग्लंडमध्ये पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करत ७५४ धावा केल्या, ज्यामुळे तो एका मालिकेत सर्वाधिक धावा करणारा भारतीय कर्णधार ठरला. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर गिलने याआधी कसोटी, एकदिवसीय आणि ट्वेन्टी-२० या तीनही प्रारूपांत शतके साकारली आहेत.
फिरकी गोलंदाजीची जबाबदारी रवींद्र जडेजा आणि वॉशिंग्टन सुंदर यांच्याकडे असेल. वेगवान गोलंदाजीची कमान जसप्रीत बुमरा, मोहम्मद सिराज यांच्याकडे असेल. गोलंदाजीचा पाचवा पर्याय म्हणून कुलदीप यादव किंवा प्रसिद्ध कृष्णा यांपैकी एकाला निवडण्यात येणार आहे. विंडीजची गोलंदाजी तुलनेने कमकूवत असल्यामुळे फलंदाजांचे वर्चस्व राहण्याची शक्यता जास्त आहे.
वेस्ट इंडिजने अखेरचा कसोटी सामना मायदेशात ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळला होता, ज्यात दुसऱ्या डावात त्यांचा संघ फक्त २७ धावांत गारद झाला. संघ गेल्या काही वर्षांपासून अपयशाच्या गर्तेत असून, भारताला प्रतिस्पर्धा कितपत देता येईल, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. कर्णधार रॉस्टन चेस याच्याकडून संघाचा मुख्य आश्वासक, तसेच ऑफ-स्पिन गोलंदाज आणि फलंदाज म्हणून अपेक्षा आहेत. अनुभवी शाय होपला मधल्या फळीत कामगिरी उंचवावी लागेल. वेगवान गोलंदाज जेडन सिल्स अहमदाबादच्या हिरव्या खेळपट्टीवर प्रभावी ठरू शकतो.
भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यात आतापर्यंत एकूण १०० कसोटी सामने खेळले गेले आहेत. यापैकी वेस्ट इंडीज ३० सामने जिंकले, तर भारतने २३ सामने जिंकले आहेत. ४७ सामने अनिर्णित राहिले.
२३ वर्षांचा दुष्काळ
वेस्ट इंडीजला या दौऱ्यावर इतिहास घडवण्याची सुवर्णसंधी आहे. कॅरेबियन संघाने २००२ पासून भारताविरुद्ध कसोटी मालिका कधीच जिंकलेली नाही. कर्णधार रॉस्टन चेस यांच्या नेतृत्वाखालील विंडीज संघाला २३ वर्षांनंतर भारताला कसोटी मालिकेत मात देण्याची संधी आहे. शिवाय, विंडीजने १९८३–८४ पासून भारतीय मैदानावर कसोटी मालिका जिंकलेली नाही, त्यामुळे ४१ वर्षांनंतर भारतात मालिका जिंकण्याची संधी देखील त्यांच्याकडे आहे. भारतीय संघ वेस्ट इंडीजविरुद्ध गेल्या काही वर्षांत वरचढ राहिला असला तरीही आकडेवारीमध्ये विंडीजची टीम अद्याप पुढे आहे.
भारत विरुद्ध वेस्ट इंडिज आकडेवारी
एकूण : १०० कसोटी
भारत विजयी : २३
वेस्ट इंडिज विजयी : ३०
अनिर्णित : ४७
वॉशिंग्टन सुंदर जखमी
दरम्यान, पहिल्या कसोटीआधी भारतीय संघातील अष्टपैलू खेळाडू वॉशिंग्टन सुंदर दुखापतग्रस्त झाला आहे. सरावादरम्यान वॉशिंग्टन सुंदरच्या बोटाला गंभीर दुखापत झाली. बोटाच्या दुखापतीमुळे तो सराव करू शकला नाही. कर्णधार गिल आणि संघातील इतर खेळाडू देखील त्याची विचारपूस करताना दिसून आले. काही वेळाने तो पुन्हा गोलंदाजी करताना दिसून आला. पण गोलंदाजी करताना त्याला वेदना होत होत्या. सुंदरची दुखापत किती गंभीर आहे, हे अजूनही स्पष्ट झालेले नाही. त्यामुळे तो खेळणार की नाही यावर अजूनही प्रश्नचिन्ह आहे. मात्र माध्यमातील वृत्तानुसार, तो वेदनने कळवळताना दिसून आला. त्यामुळे टीम मॅनेजमेंट त्याच्याबाबत काय निर्णय घेणार, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. वॉशिंग्टन सुंदर संघात असणे खूप महत्वाचं आहे. कारण न्यूझीलंडविरूद्ध मायदेशात झालेली कसोटी मालिका असो किंवा इंग्लंड दौरा असो, या दोन्ही मालिकांमध्ये त्याने अष्टपैलू कामगिरी करून संघाच्या विजयात मोलाचे योगदान दिले आहे. जर दुखापतीमुळे तो पहिला कसोटी सामना खेळू शकला नाही,तर त्याच्या जागी डावखुरा अष्टपैलू खेळाडू अक्षर पटेलला संधी दिली जाऊ शकते. अक्षर पटेल देखील गोलंदाजीसह फलंदाजीत योगदान देऊ शकतो.

भारतीय संघ
शुभमन गिल (कर्णधार), रवींद्र जडेजा (उपकर्णधार), यशस्वी जैस्वाल, केएल राहुल, साई सुदर्शन, देवदत्त पडिक्कल, ध्रुव जुरेल (यष्टिरक्षक), नारायण जगदीशन (यष्टिरक्षक), नितीश रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा.
वेस्ट इंडिजचा संघ
रॉस्टन चेस (कर्णधार), केव्हलॉन अँडरसन, अलिक अथानाझे, जॉन कॅम्पबल, तेगनारायण चंद्रपॉल, शाय होप (यष्टिरक्षक), टेविन इम्लाच (यष्टिरक्षक), ब्रँडन किंग, जस्टिन ग्रीव्हस, जोहान लेन, खेरी पिएर, जोमेल वॉरिकन, जेडन सिल्स, अँडरसन फिलिप्स, जेदी ब्लेड्स.

आजचा सामना
भारत वि. वेस्ट इंडिज​

वेळ : सकाळी ९.३० वा.
स्थळ : नरेंद्र मोदी स्टेडियम, अहमदाबाद
थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १, स्टार स्पोर्ट्स १ हिंदी, जिओहॉटस्टार