गोवन स्पोर्ट्स क्लब यू.के.चा उपक्रम : एकेरीत रोज रिबेलो, दुहेरीत डिकुन्हा-कार्व्हालो विजेते
लंडन (यूके) : ‘गोवन स्पोर्टस् क्लब यू.के.’ ने सोशल स्पोर्टस् बार, हाउन्सलो येथे 'गोवन कॅरम कप २०२५' चे यशस्वी आयोजन केले. या स्पर्धेत युनायटेड किंग्डममधील विविध भागांतून गोमंतकीय समाजातील सदस्य मोठ्या संख्येने एकत्र आले. खेळ आणि स्नेहाच्या या मेळाव्यात यूकेतील गोमंतकीय हिंदू, मुस्लिम आणि ख्रिस्ती समाजातील तरुण आणि ज्येष्ठ नागरिकांच्या उत्साही सहभागामुळे एकात्मतेचे आणि विविधतेचे सुंदर दर्शन घडले.
रोज रिबेलो एकेरीची, जॉन डीकुन्हा-एलरॉय कार्व्हालो दुहेरीचे विजेते ठरले. यावर्षीच्या स्पर्धेत एकूण २४ खेळाडूंनी एकेरी विभागात, तर १२ संघांनी दुहेरी विभागात सहभाग घेतला. स्पर्धेतील सर्व सामने अत्यंत चुरशीचे आणि रंगतदार झाले.
एकेरी विभागात रोज रिबेलो विजेती ठरली, तर खादर शेख उपविजेता ठरला. त्याचप्रमाणे दुहेरी विभागात जॉन डिकुन्हा आणि एलरॉय कार्व्हालो यांनी विजेतेपद पटकावले, तर रोज रिबेलो आणि मायरन फर्नांडिस उपविजेते ठरले.
विजेत्यांना माल्कम सिल्वेरा यांच्या हस्ते बक्षिसे प्रदान करण्यात आली. यावेळी त्यांनी गोवन स्पोर्टस् क्लब यू.के.चे कौतुक केले आणि खेळ व सामुदायिक कार्यक्रमांच्या माध्यमातून 'गोमंतकीय आत्मा' जिवंत ठेवण्यात क्लब महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचे नमूद केले.
गोमंतकीय ओळख आणि एकतेचा उत्सव
विशेष म्हणजे, क्लबच्या स्थापनेनंतर अवघ्या एका वर्षात आयोजित केलेला हा पाचवा कार्यक्रम होता, जो स्थलांतरित गोमंतकीय समाजाला एकत्र आणण्याच्या क्लबच्या प्रयत्नांची आणि वाढत्या भूमिकेची साक्ष देतो. ही स्पर्धा केवळ कौशल्य आणि स्पर्धात्मकतेचे प्रदर्शन नव्हती, तर सांस्कृतिक अभिमान आणि लंडनमधील सजीव गोमंतकीय ओळख यांचा एक मोठा उत्सव ठरली.