३ मोठे बदल अपेक्षित; नव्या चेहऱ्यांना मिळू शकते संधी
दुबई : आशिया कप २०२५ मध्ये भारतीय संघाने आतापर्यंत उत्तम कामगिरी करत सुपर-४ फेरीत प्रवेश निश्चित केला आहे. सूर्यकुमार यादव पहिल्यांदाच मोठ्या स्पर्धेत भारतीय संघाचे नेतृत्व करत असून, त्याच्या नेतृत्वाखाली भारताने पहिल्या सामन्यात यूएईवर आणि दुसऱ्या सामन्यात पाकिस्तानवर एकतर्फी विजय मिळवला.
यानंतर भारताचा पुढील सामना ओमानविरुद्ध होणार आहे. सुपर-४ साठी भारत आधीच पात्र ठरल्याने, या सामन्यात व्यवस्थापनाला प्रमुख खेळाडूंना विश्रांती देऊन बाकावर असलेल्या खेळाडूंना संधी देण्याची संधी आहे. त्यामुळे या सामन्यात टीम इंडियाच्या प्लेइंग ११ मध्ये ३ मोठे बदल पाहायला मिळू शकतात.
भारतीय संघाच्या टॉप ऑर्डरमध्ये बदल होण्याची शक्यता आहे. तिलक वर्माच्या जागी रिंकू सिंगला संधी दिली जाऊ शकते. रिंकूला अजून मोठ्या स्पर्धेत स्वतःला सिद्ध करण्याची संधी मिळालेली नाही. त्यामुळे ओमानविरुद्ध त्याला खेळवले गेले, तर त्याची फिनिशिंगची ताकद भारतीय संघासाठी ठरणार आहे महत्त्वाची.
सुरुवातीच्या दोन्ही सामन्यांमध्ये अर्शदीपला खेळवले गेले नव्हते. पण ओमानविरुद्धच्या सामन्यात त्याला संधी मिळण्याची शक्यता आहे. जसप्रीत बुमराहला विश्रांती दिली जाऊ शकते आणि त्याच्या जागी अर्शदीप खेळेल. विशेष म्हणजे अर्शदीप आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत १०० विकेट्सच्या उंबरठ्यावर आहे. हा विक्रम तो या सामन्यात गाठू शकतो.
वेगवान गोलंदाज हर्षित राणालाही संघात स्थान दिले जाऊ शकते. त्याला संधी देण्यासाठी ऑलराऊंडर शिवम दुबेला विश्रांती दिली जाऊ शकते.
भारत-पाकिस्तान पुन्हा भिडणार
आशिया चषक २०२५ च्या अ गटात भारत आणि पाकिस्तानसह युएई व ओमान हे संघ होते. यापैकी भारत आणि पाकिस्तानचे संघ गट टप्प्यातील दोन विजयांसह सुपर फोरसाठी पात्र ठरले. यासह दोन्ही कट्टर प्रतिस्पर्धी संघ आता येत्या २१ सप्टेंबरला म्हणजेच रविवारी पुन्हा एकदा भिडताना दिसणार आहेत. हा सामना दुबईतील इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियममध्ये होणार आहे. गट टप्प्यातील सामन्यांप्रमाणेच हा सामनादेखील रात्री ८ वाजता सुरू होणार आहे.
पाकिस्तानचा संघ युएईविरूद्ध सामन्यात मोठी कडवी झुंज देत सुपर फोरमध्ये पोहोचला आहे. टीम इंडियाने आतापर्यंत गट टप्प्यात दोन सामने खेळले आहेत आणि हे दोन्ही सामने सहज जिंकल्यानंतर ते अव्वल स्थानावर आहेत आणि नेट रन रेट पाहता अव्वल स्थानावर राहतील.पाकिस्तानचे गट-टप्प्यातील तिन्ही सामने पूर्ण झाले आहेत. तीनपैकी पाक संघाने दोन सामने जिंकले आहेत. युएई आणि ओमानचे संघही स्पर्धेबाहेर झाले आहेत. युएईचे देखील स्पर्धेतील आव्हान संपले असून त्यांनी एक सामना जिंकला. तर ओमानने सुरूवातीचे दोन्ही सामने गमावले आहेत आणि संघाचा तिसरा सामना भारताविरूद्ध होणार आहे.
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील गट टप्प्यातील सामना देखील दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळला गेला, जिथे भारतीय संघाने पाकिस्तानला एकतर्फी पराभव पत्करला. प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानला २० षटकांत ९ गडी गमावून फक्त १२७ धावा करता आल्या.
भारताचा संघ
सूर्यकुमार यादव (कर्णधार), अभिषेक शर्मा, शुभमन गिल, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), तिलक वर्मा / रिंकू सिंग, हार्दिक पांड्या, हर्षित राणा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, वरुण चक्रवर्ती
बेंच स्ट्रेंथ तपासण्याची संधी
भारतीय संघ आधीच सुपर-४ फेरीसाठी पात्र ठरल्याने हा सामना संघासाठी फारसा महत्त्वाचा नाही. परंतु या सामन्यात नव्या खेळाडूंना स्वतःला सिद्ध करण्याची मोठी संधी असणार आहे. त्यामुळे ओमानविरुद्धचा सामना टीम इंडियासाठी बेंच स्ट्रेंथ तपासण्याची संधी ठरणार आहे.