वाळपई : भुईपाल येथील एका घरामध्ये दोन लहान भावंडे अडकण्याची घटना गुरुवारी घडली. वाळपई अग्निशामक दलाच्या तत्परतेमुळे दोघांची सुखरूप सुटका करण्यात त्यांना यश आले.
गौरव (दोन वर्षे) व मनस्वी (एक वर्ष) ही दोघे भावंडे घरामध्ये खेळत होती. त्यांनी अचानकपणे घरातील आतील भागातून कडी घातली. यामुळे दरवाजा बंद झाला. दोघांना बाहेर येण्यासाठी अडचण निर्माण झाली. याबाबतची माहिती घरातील मंडळी व सभोवतालच्या नागरिकांना मिळताच त्यांनी घराचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला. मात्र, सदर दरवाजा उघडणे शक्य झाले नाही. शेवटी याबाबतची माहिती वाळपई अग्निशामक दलाच्या यंत्रणेला देण्यात आल्यानंतर त्यांनी ताबडतोब घटनास्थळी धाव घेऊन घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून दोघांनाही सुखरूप बाहेर काढले. बराच वेळ सदर भावंडे घरामध्ये अडकल्यामुळे ती घाबरलेल्या अवस्थेत होती. घरातील कुटुंबाची यामुळे हलाखीची परिस्थिती निर्माण झाली होती. शेवटी दोघांनाही सुखरूपपणे बाहेर काढल्यामुळे वाळपई अग्निशामक दलाच्या जवानांचे कुटुंबीयांनी आभार मानले.
प्राप्त माहितीनुसार, सदर दोन्ही भावंडे घरामध्ये खेळत होती. खेळताना अचानकपणे त्यांनी दरवाजा बंद केला व आतून दरवाजा लॉक झाला. यामुळे सदर दरवाजा उघडणे शक्य झाले नाही, अशी माहिती प्राप्त झाली आहे.


