१७० अर्ज प्रलंबित : योजनेमुळे कोविडनंतर पथविक्रेत्यांना मिळाली आर्थिक मदत

पणजी : कोविड काळानंतर नुकसान सहन केलेल्या रस्तावरील विक्रेत्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी केंद्र सरकारने सुरू केलेल्या प्रधानमंत्री स्वनिधी योजनेचा लाभ आतापर्यंत दीड हजारांहून अधिक गोमंतकीय विक्रेत्यांनी घेतला आहे. गोव्यातील एकूण १,७४० अर्जांपैकी १,५७० लाभार्थ्यांना आतापर्यंत कर्ज वितरित करण्यात आले असून, १७० अर्ज अद्याप प्रलंबित आहेत, अशी माहिती शहरी विकास मंत्रालयाने दिली आहे.
कोविड काळात उद्भवलेल्या आर्थिक अडचणींमुळे अनेक छोटे विक्रेते, स्टॉलधारक, हातगाडीवाले इत्यादींच्या उत्पन्नावर विपरित परिणाम झाला होता. हे लक्षात घेऊन केंद्र सरकारने रस्तावरील विक्रेत्यांना पुन्हा व्यवसाय उभारण्यासाठी प्रधानमंत्री स्वनिधी योजना सुरू केली.
या योजनेअंतर्गत विक्रेत्यांना पुढील तीन टप्प्यांमध्ये व्यवसायासाठी कर्ज देण्याची तरतूद आहे. पहिला टप्पा १० हजार रुपयांपर्यंतचे कर्ज मिळते, पहिले कर्ज १२ महिन्यांनी भरल्यानंतर दुसरे ३० हजार रुपयांपर्यंत कर्ज मिळते. दुसरे कर्ज वेळेवर फेडल्यास ५० हजार रुपयांपर्यंत कर्ज दिले जाते. चहा-भजी विक्रेते, रस-आमलेट गाड्या, फळ-फुल विक्रेते, इतर लहान व्यावसायिक अशा रस्त्यावरील विक्रेत्यांना या योजनेचा लाभ घेता येतो. 
योजनेद्वारे मिळणारे फायदे
- कर्जाचे हप्ते वेळेवर भरल्यास व्याजात ७ टक्केपर्यंत अनुदान दिले जाते.
- डिजिटल पेमेंट करणाऱ्यांसाठी दर महिन्याला ५० ते १०० रु. पर्यंत कॅशबॅक मिळतो.