पाणी बिल ८३ हजारांचे, तक्रारीनंतर आले दीड हजारांवर

कामुर्लीतील महिलेने दोन वर्षे केला पाठपुरावा


12th August, 12:32 am
पाणी बिल ८३ हजारांचे, तक्रारीनंतर आले दीड हजारांवर

अधिकार्‍यांशी चर्चा करताना फिडॉल परेरा व मारिया डायस. (संतोष मिरजकर)
प्रतिनिधी। गोवन वार्ता
मडगाव : कामुर्लीतील मारिया डायस यांच्या घरातील पाण्याचे बिल जुलै २०२३ मध्ये ८३ हजार ३०६ रुपये एवढे पाठवण्यात आले. बिलाबाबत तक्रार केल्यानंतरही बिल न भरल्याने जोडणी तोडण्यात आली. तीनवेळा तक्रारी करून आता दोन वर्षांच्या पाठपुराव्यानंतर डायस यांना दीड हजार रुपयांचे बिल भरून घेऊन पाणीजोडणी पूर्ववत करण्यात आली.


सार्वजनिक बांधकाम खात्याच्या पाणीपुरवठा विभागाच्या कामकाजावर साशंकता घेण्यासारखा हा प्रकार आहे. कामुर्लीतील उझरो गावोन येथील मारिया नेविटा डिसोझा इ डायस यांच्या घरातील पाण्याच्या मीटरचे बिल जुलै २०२३ मध्ये ८३ हजार ३०६ रुपये पाठवण्यात आले होते. त्यांनी बिलात काहीतरी घोटाळा असल्याची तक्रार दिली असतानाही पाणीजोडणी तोडून मीटर काढून नेण्यात आले. डायस यांचे छोटेसे घर असून त्यांना एवढे बिल कसे आले याबाबत तक्रार करण्यात आली. तेव्हापासून नळजोडणी पूर्ववत करून देण्यासाठी डायस पुन्हा पुन्हा बांधकाम खात्याच्या पाणीपुरवठा विभागातील अभियंत्यांची भेट घेत होत्या. तक्रारीनंतर प्रथम ८३ हजारांवरून ५३ हजारांचे बिल देण्यात आले. ऑगस्ट २०२३ मध्ये अभियंत्यांनी बिलाची रक्कम कमी करून ४० हजार ८३७ रुपये भरण्यास सांगितले. मात्र, ही रक्कमही चुकीची असल्याचे डायस यांनी अभियंत्यांना सांगितले. त्यानंतर पुन्हा तक्रार केल्यानंतर वारंवार पाठपुरावा केल्यानंतर २४ युनिटसाठी ३,९३६ चा फरक काढून रक्कम भरायला सांगितली होती.


सामाजिक कार्यकर्त्यांनी घेतली अभियंत्यांची भेट
डायस यांनी सामाजिक कार्यकर्त्या फिडॉल परेरा यांच्या सहकार्यातून सोमवारी बोर्डा येथील कार्यालयात जाऊन अभियंत्यांची भेट घेतली. त्यानंतर नियमानुसार जेवढी रक्कम होते, तेवढी रक्कम अदा करून घेऊन डायस यांची नळजोडणी करून देण्याची मागणी केली. अधिकार्‍यांनी या प्रकरणाची दखल घेऊन दीड हजारांचे बिल अंतिम करून पैसे अदा करून घेतले. त्यानंतर नळजोडणीही पूर्ववत करून दिली.

हेही वाचा