गोव्यात नागनाथ नावाने शिवलिंगे पुजली जात असून, बऱ्याच लिंगावर नागाने छत्र धरल्याचे चित्रित केलेले आहे. नागासंदर्भात गोमंतकीय समाजात लोकसंकेत पूर्वापार रूढ आहेत.
सरपटणाऱ्या प्राण्यांत अगदी आदिम काळापासून मानवाला आपल्या रंगरूपाने आणि फणा उभारण्याच्या कृत्याने अचंबित करणाऱ्या नागाला लक्षणीय स्थान होते. अज्ञात काळात जेव्हा लोकधर्म आकारास येऊ लागला, तेव्हा तत्कालीन माणसाने प्राणघातक दंश करणाऱ्या नागाने आपल्याला इजा करू नये आणि गाईगुरांना अभय द्यावे, या भाबड्या आशेने नागाची चित्रे, मूर्ती पुजण्यास प्रारंभ केला असावा. सागर किनारी वसलेल्या गोव्यात नागपूजनाची वैविध्यपूर्ण परंपरा नानाविध संस्कृती, परंपरांच्या समृद्धतेचे दर्शन घडवत असते. गोव्यात केवळ नागप्रतिमाच नव्हे तर नागाचा नैसर्गिक अधिवास सुरक्षित ठेवण्याची परंपरा शेकडो वर्षांपासूनची आहे.
भारतातील आदिम जमातीत प्रामुख्याने नागपूजा असून ही परंपरा वेदपूर्व काळापासून प्रचलित आहे. सिंधू संस्कृतीतील मोहेंजोदारो येथील उत्खननात नागमूर्ती आढळल्या आहेत. केवळ भारतातच नव्हे तर जगातल्या अन्य आदिम जमातीत नागपूजनाची परंपरा रूढ असलेली पहायला मिळते. हिंदू धर्मात नागपूजा महत्त्वाची मानली आहे. भगवान शिव गळ्यात आणि मस्तकी नाग धारण करतात तर श्रीविष्णू शेष या सापावर निद्राधीन होतात असल्याच्या मूर्ती प्रचलित आहेत. भगवान बुद्धाच्या आणि जैन धर्मात पाश्वनाथाच्या जीवनात नागाचे योगदान असल्याने बऱ्याच बौद्ध आणि जैन प्रतिमांत नाग चित्रित करण्यात आला आहे.
गोव्यात नागेशी, नागाळी, नागवे, नागोवा ही स्थळनावे इथल्या ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि सामाजिक जीवनात असलेल्या नाग माहात्म्याची प्रचिती देतात. गोव्यात जेथे सांतेर, भूमका या देवता आहेत त्यांचे पूजन पूर्वी मृण्मयी वारुळाच्या रूपात केले जायचे आणि त्या वारुळात नागाचे वास्तव्य असल्याची पूर्वापार लोकश्रद्धा रूढ आहे.
बऱ्याच ठिकाणी गणपतीच्या मूर्तीत नाग दाखवलेला असून, गोवा - कोकणातील मंदिरांत जेथे बाह्मणी देवीचे मूर्तिरुपात पूजन केले जाते, तेथे तिच्या दोन्ही हातात नाग धारण केलेले दाखवण्यात आलेले आहे. धारबांदोड्यातील तांबडीसुर्लाजवळच्या तयडे गावातील ब्राह्मणी मायेच्या वृक्षवेलींनी नटलेल्या राईत ब्राह्मणीची महाकाय मूर्ती दोन्ही हाती नागासह कोरलेली पहायला मिळत होती. ही देवराई नागांसाठी प्रसिद्ध होती. सत्तरीतील कोपार्डे गावातील लोकसहभागातून सुरक्षित राखलेली ब्राह्मणीची देवराई नागांसाठी प्रसिद्ध असून, इथे पूर्वापार गावात कधी नागाचा दंश होऊन मृत्यू झालेला आजतागायत पाहिला नसल्याचे इथले लोक सांगत असतात. दोन्ही हाती नाग साप धारण केलेल्या ब्राह्मणीच्या पाषाणी मूर्ती मंदिराच्या गर्भगृहात तसेच देवराईत पहायला मिळतात. या देवराईत नागाला अभय प्रदान केलेले आहे.
केरळ राज्यात ज्याप्रमाणे 'सर्प कवू' म्हणजे नागप्रतिमा असलेल्या देवराया पहायला मिळतात, त्याचप्रमाणे गोव्यातही ब्राह्मणाची जागा म्हणून देवराया राखल्या जायच्या आणि त्यात नाग प्रतिमा पहायला मिळतात आणि अशा पवित्र स्थळात नागाचे वास्तव्य असून त्याला कोणत्याच प्रकारची इजा पोचवू नये, असा संकेत पाळला जातो.
शिगावात अशी एक महावृक्षांनी नटलेली देवराई असून तेथे एकत्रित नागयुगल असून त्यांच्या माथी छत्र चित्रित केले आहे. मोटोजे येथील सावंत कुटुंबीय या नागयुगलाची पूजा करतात. डिचोली, फोंडा तसेच गोव्यात काही ठिकाणी नागझरी असून तेथील झऱ्याचे पाणी पेयजल म्हणून स्थानिक वापरत असत आणि त्या नागझरीचे पावित्र्य जपण्याबरोबर तेथे नागाचे वास्तव्य असल्याचे मानून झरीची निगा राखत असत.
गोव्यात आणि महाराष्ट्र, कर्नाटक राज्यांतही श्रावण शुद्ध पंचमीला नाग प्रतिमेची पूजा केली जाते. घरातील ठराविक जागी हळदीचा किंवा रक्तचंदनाचा लेप लावून नागपंचमीच्या दिवशी भिंतीवर चित्र रेखाटायचे. गोव्यात पूर्वीच्या काळी सुवासिनी स्त्रिया आपल्या परिसरात असणाऱ्या वारुळाची पूजा दूध आणि लाह्या अर्पण करून करायच्या आणि त्यावेळी...
चल ग सये वारुळाला
नागोबाला पुजायाला
हळद कुंकू वहायला
अशी लोकगीत गायच्या.
सत्तरीतील वांते गावात खाण व्यवसायाचा प्रवेश होण्याअगोदर इथे वारुळे मोठ्या संख्येने होती आणि त्यामुळे आपल्या पारंपरिक लोकगीतात वारुळाचा उल्लेख करायच्या.
वयले वयले दोंगरी
सोरपाच्या रोयणी
नागपंचमीदिवशी वारुळाला इजा करू नये आणि अळंबी काढू नये असे लोकसंकेत प्रचलित होते.
नागपंचमीला। नागा चंदनाचे गंध।
तुटती भवबंध। पुजणाऱ्याचे॥
अशी लोकश्रद्धा रूढ होती.
गोव्यात नागनाथ नावाने शिवलिंगे पुजली जात असून, बऱ्याच लिंगावर नागाने छत्र धरल्याचे चित्रित केलेले आहे. नागासंदर्भात गोमंतकीय समाजात लोकसंकेत पूर्वापार रूढ आहेत. नागाची वस्ती पाताळात असल्याचे, गुप्तधनावर नाग वेटोळे घालून संरक्षण करत असल्याची, नाग सापाला ठार केल्यास नागबळी विधी करण्याचे बंधन लोक पाळतात. नागाच्या मस्तकी रत्नमणी असतो आणि त्याच्या उजेडात तो संचार करतो, अशा समजुती प्रचलित आहेत.
गोव्यात श्रावण शुद्ध पंचमीला जशी मृण्मयी नाग प्रतिमांची पूजा करतात, त्याचप्रमाणे भाद्रपदातील अनंत चतुर्दशीच्या व्रत प्रसंगी दर्भापासून पाच फणांचा नाग काही कुटुंबांत पूजला जातो. नागपंचमीला काही कुटुंबात सामूहिकरित्या मृण्मयी नाग पुजण्याची परंपरा आहे. गोव्यात नागपंचमीचा सण श्रावणात साजरा करताना हळदीच्या हिरव्यागार पानात उकडीच्या पिठात गुळ खोबरे लपेटून तयार केलेल्या पातोळ्यांचा आस्वाद शाकाहारी जेवणासह घेतला जातो. संध्याकाळी अळूच्या पानावर पुजलेल्या मातीच्या प्रतिमेसह विसर्जन करून गुळ खोबऱ्याचा नैवेद्य वाटला जातो. नाग हा जहरी साप असल्याने त्याने आपणास आणि समस्त कुटुंबियांना इजा पोचवू नये, या भावनेने पूजन करण्याची परंपरा पाळली जाते.
प्रा. राजेंद्र केरकर
(लेखक ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते
असून पर्यावरणप्रेमी आहेत.) मो. ९४२१२४८५४५