‘मिशन अस्मिता’अंतर्गत यूपी पोलिसांची कारवाई
नवी दिल्ली : उत्तर प्रदेश पोलिसांनी शनिवारी ‘मिशन अस्मिता’ अंतर्गत मोठ्या कारवाईत बेकायदेशीर धार्मिक धर्मांतर करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश केला. हे रॅकेट आयसिसच्या धर्तीवर कार्यरत असल्याचे उघडकीस आले असून, या कारवाईत सहा राज्यांतून १० संशयितांना अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्यांमध्ये एका महिलेसह राजस्थान, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, दिल्ली, उत्तराखंड आणि गोवा येथील आरोपींचा समावेश आहे.
या प्रकरणाचा तपास मार्च २०२५ मध्ये सुरू झाला, जेव्हा आग्रा येथे राहणाऱ्या ३३ आणि १८ वर्षांच्या दोन बहिणींच्या बेपत्ता होण्याची तक्रार दाखल करण्यात आली. तपासादरम्यान पोलिसांनी एका मुलीचा सोशल मीडियावरील फोटो पाहिला, ज्यात तिच्या हातात एके-४७ रायफल होती. यामुळे संशय बळावला आणि पोलिसांनी तपासाचा वेग वाढवला.
आग्राचे पोलीस आयुक्त दीपक कुमार यांनी सांगितले की, या दोघींना ‘लव्ह जिहाद’ आणि कट्टरतावादी नेटवर्कद्वारे लक्ष्य करण्यात आले होते. प्राथमिक चौकशीत दोघींवर धर्मांतर करण्यासाठी दबाव टाकल्याचे स्पष्ट झाले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या रॅकेटला अमेरिका आणि कॅनडामधून परकीय निधी मिळत होता. या पैशांचा उपयोग धर्मांतर, निवारा पुरवणे, कट्टरतावाद पसरवणे आणि तरुणींना गळाला लावण्यासाठी करण्यात येत होता.
अटक करण्यात आलेल्या १० जणांनी नेटवर्कमध्ये वेगवेगळ्या भूमिका बजावल्या होत्या. त्यामध्ये निधी संकलन, निवारा व्यवस्थापन, सोशल मीडियावर कट्टर प्रचार, टार्गेट शोधणे आणि अंततः बेकायदेशीर धर्मांतर करण्यास प्रवृत्त करणे, अशा कामांमध्ये त्यांचा सहभाग होता. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये गोव्यातून आयशा ऊर्फ एस. बी. कृष्णा, कोलकात्यातून अब्बू तालिब खलापर, उत्तराखंड (देहरादून) येथून अबुर रहमान, दिल्लीतून मुस्तफा ऊर्फ मनोज, जयपूर येथून मोहम्मद अली व जुनैद कुरेशी अशी आहेत. राजस्थान (इतर) येथून ३ अज्ञात आरोपी, उत्तर प्रदेश व पश्चिम बंगालमधून प्रत्येकी दोन आरोपी फरार आहेत.
राज्याचे पोलीस महासंचालक राजीव कृष्णा यांनी स्पष्ट केले की, आरोपींना पोलीस कोठडीत ठेवून पुढील तपास केला जाणार आहे. या नेटवर्कचा फैलाव किती व्यापक आहे आणि त्याचे विदेशी कनेक्शन नेमके कशा स्वरूपाचे आहे, याचा शोध लावण्यासाठी तपास अधिक खोलवर नेला जाईल.
‘मिशन अस्मिता’अंतर्गत सरकारची पावले
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखाली उत्तर प्रदेश सरकारने 'मिशन अस्मिता' हा विशेष उपक्रम सुरू केला आहे. बेकायदेशीर धर्मांतर, लव्ह जिहाद, कट्टरतावाद आणि परकीय निधीच्या माध्यमातून चालणाऱ्या देशविरोधी कारवायांना रोखणे हा या मोहिमेचा उद्देश आहे. या मोहिमेअंतर्गत विशेष कार्यदल (एसटीएफ) आणि दहशतवाद विरोधी पथक (ATS) सक्रिय करण्यात आले आहे. पोलिसांनी या प्रकरणाची गंभीरता लक्षात घेऊन देशभरातील इतर राज्यांतील यंत्रणांशीही समन्वय साधला आहे.