पणजी पोलिसांकडून चेन्नईतून संशयिताला अटक
पणजी : बनावट दस्तावेज तसेच नाव धारण करून पासपोर्ट मिळविण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली. या प्रकरणी पणजी पोलिसांनी पंकज प्रफुल चौरे (रा. खोर्ली - म्हापसा) हे नाव धारण केलेल्या व्यक्तीला चेन्नईहून अटक केली आहे.पोलीस याबाबत अधिक तपास करीत आहेत.
उत्तर गोवा पोलीस अधीक्षक राहुल गुप्ता यांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणी निजो वर्गीस या पासपोर्ट अधिकाऱ्याने १० जुलै रोजी तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार, ३० जून २०२५ पूर्वी पंकज प्रफुल चौरे (रा. खोर्ली - म्हापसा) हे नाव धारण करून एका व्यक्तीने पासपोर्ट मिळविण्यासाठी ऑनलाईन अर्ज केला. त्यासाठी त्या व्यक्तीने जन्म प्रमाणपत्र, पॅन कार्ड आणि आधार कार्ड सादर केले होते. अर्जाची छाननी केली असता, प्रथमदर्शनी वरील दस्तावेज बनावट असल्याचे अधिकाऱ्याच्या लक्षात आले. त्यानंतर या प्रकरणी सदर व्यक्ती कार्यालयात आल्यानंतर त्याच्याकडे वरील दस्तावेज बाबत चौकशी केली असता, त्याला त्याची बनावटगिरी सापडल्याचे लक्षात आले. त्यानंतर तो तेथून पसार झाल्याचे तक्रारीत म्हटले आहे. याची दखल घेऊन पणजी पोलीस निरीक्षक विजयकुमार चोडणकर यांच्या मार्गदर्शनाखाली महिला उपनिरीक्षक रश्मिका कवळेकर यांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला.
दरम्यान सदर व्यक्ती चेन्नईत असल्याचे समोर आल्यानंतर तेथील पोलिसांना संपर्क करण्यात आला. त्याला ताब्यात घेण्यात आल्यानंतर तेथून त्याला गोव्यात आणले. त्यानंतर शनिवार, १२ रोजी संशयिताला अटक करण्यात आली. अटक केलेल्या संशयिताला रविवारी पोलीस कोठडीसाठी पणजी येथील प्रथमवर्ग न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
खरी ओळख शोधणे पोलिसांसमोर आव्हान
पोलीस आणि पासपोर्ट अधिकाऱ्यांनी केलेल्या प्राथमिक चौकशीत संबंधित व्यक्तीने वर नमूद केलेले नाव वापरून बनावट कागदपत्रे तयार केली असण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यामुळे या व्यक्तीची खरी ओळख आणि त्याचे खरे नाव काय आहे, हे शोधणे पोलिसांसमोर मोठे आव्हान ठरत आहे.