मुंबईतील एका तरुणाला अटक, पर्वरी पोलिसांची कामगिरी
पणजी : पार्ट टाईम नोकरीची ऑफर देत गुगलवर प्रति रेटिंग ४० रुपयांचा परतावा देण्याचे आमिष दाखवून जाळ्यात ओढत वेरे-बार्देश येथील एका युवकाची तब्बल ९ लाख ५० हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी पर्वरी पोलिसांनी मुंबईतील २६ वर्षीय तरुणाला अटक केली आहे. आरोपीने पीडिताला टेलिग्राम अॅपवर कामाच्या स्वरूपाची माहिती दिली आणि नंतर त्याच्याकडून अनेक व्यवहारांच्या माध्यमातून मोठी रक्कम उकळली.
नेमके प्रकरण काय ?
पर्वरी पोलीस स्थानकात वेरे येथील रहिवाशाने दिलेल्या तक्रारीनंतर ५ जून २०२५ रोजी भारतीय न्याय संहिता कलम ३१९(२) आणि आयटी कायदा कलम ६६(डी) अंतर्गत एफआयआर नोंदवण्यात आला होता. २५ मे ते २ जूनदरम्यान पीडिताला गूगल रेटिंग देण्याचे पार्टटाइम जॉब देण्याचे आमिष दाखवण्यात आले. प्रत्येक रेटिंगसाठी ४० रुपये देण्याचे ठरले होते. यानंतर त्याला टेलिग्राम अॅप डाऊनलोड करून काही टास्क पूर्ण करण्यास सांगण्यात आले. त्यानंतर विश्वास संपादन करून विविध कारणांखाली एकूण ९,५०,१४९ रुपये जी-पे, एटीएम ट्रान्सफर आणि इतर पद्धतीने उकळण्यात करण्यात आले
पर्वरी पोलिसांनी तांत्रिक तपासाअंतर्गत अनेक बँक खात्यांचे आणि मोबाईल नंबर्सचे विश्लेषण केले असता फसवणुकीत अनेक लोक सामील असल्याचे उघड झाले. त्यानंतर पोलिसांनी तांत्रिक पाळत ठेवत मुंबईत आरोपीचा ठावठिकाणा शोधून काढला. २८ जून २०२५ रोजी पर्वरी पोलीस स्थानकाचे पोलीस उपनिरीक्षक अरुण शिरोडकर, पोलीस कॉन्स्टेबल अक्षय नावेलकर, हेमंत गावकर आणि ऋषिकेश शेटगावकर यांनी मुंबई गाठून आरोपीला ताब्यात घेतले. दरम्यान पर्वरी पोलीस स्थानकाचे निरीक्षक राहुल परब यांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव जगदीश बोकोलिया (वय २६) असून तो आदर्श नगर, शेल कॉलनी रोड, चेंबूर-मुंबई येथील रहिवासी आहे.
याप्रकरणी पुढील तपास उत्तर गोव्याचे पोलीस अधीक्षक राहुल गुप्ता आणि पर्वरीचे उपअधीक्षक विश्वेश कर्पे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच पर्वरी पोलीस स्थानकाचे निरीक्षक राहुल परब यांच्या नेतृत्त्वाखाली सुरू आहे.